इस्लामपुरात बाजार भाडे वसुलीत भ्रष्टाचार
By Admin | Updated: April 3, 2015 23:56 IST2015-04-03T23:16:13+5:302015-04-03T23:56:10+5:30
लाखोंच्या गैरव्यवहाराचा संशय : बोगस पावत्यांबाबत चौकशी करण्याची मागणी

इस्लामपुरात बाजार भाडे वसुलीत भ्रष्टाचार
अशोक पाटील - इस्लामपूर शहरात आठवड्यातून रविवार व गुरुवार या दिवशी मोठ्या प्रमाणात बाजार भरतो. या बाजाराव्यतिरिक्त सकाळच्या सत्रात जुनी भाजी मंडई येथे, तर दुपारच्या सत्रात मुख्य बाजार कट्ट्यावर बाजार भरत असतो. बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून नगरपालिका जागाभाडे वसूल करते, तर गावातील खोकी, फिरते गाडे आणि रस्त्यावर बसलेले व्यापारी यांच्याकडूनही भाडे वसूल केले जाते. या भाड्यापोटी दिलेल्या पावत्यांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. यासाठी चौकशी समिती नेमावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.गुरुवार दि. २ एप्रिल रोजी बाजारासाठी आलेले मलकापूर येथील लसून व्यापारी संतोष बाबू कोंदल यांना सकाळच्या सत्रातील कर्मचाऱ्याने १0 रुपयांच्या १0 पावत्या देऊन १00 रुपये भाडे वसूल केले होते. परंतु दुपारच्या सत्रातील कर्मचाऱ्याने सकाळी दिलेल्या पावत्या परत घेऊन १0 रुपयांच्या ६ पावत्या दिल्या. या पावत्यांवर वेगवेगळ्या तारखा असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या प्रकारात गोलमाल असल्याचे स्पष्ट होत आहे, असे आमच्या प्रतिनिधीच्या लक्षात आले. याबाबत नगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधला असता सकाळ व सायंकाळच्या सत्रातील भाजी मार्केट आणि शहरातील खोकीधारक, हातगाडे, रस्त्यावर विक्रीस बसणाऱ्या व्यापाऱ्यांकडून दिवसाकाठी अडीच हजार रुपये वसूल केले जातात, तर बाजारा दिवशी ४ ते ५ हजार रुपये वसूल होत असल्याचे सांगण्यात आले. वास्तविक शहरातील फक्त खोक्यांची संख्या पाहिली, तर ५00 च्या वर आहे. याचीच रक्कम १0 रुपयांप्रमाणे ५ हजारावर होते. हातगाडे, बाजारात व रस्त्यावर बसणाऱ्या व्यापारी आदींची संख्या पाहता, वसुली केलेले पैसे व पालिकेत जमा होत असलेले पैसे यात मोठी तफावत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.सध्या बाळासाहेब शंकर सूर्यवंशी आणि विष्णू संभाजी माळी हे पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी शहरातील हे भाडे वसुलीचे काम पाहतात. गेल्या अनेक वर्षांपासून हे कर्मचारी बड्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना मलिद्यासह भाजीपाला घरपोहोच करीत असल्यानेच हा सावळागोंधळ सुरु असल्याची चर्चा व्यापारी वर्गातून आहे. हे कर्मचारी आपली सेवा इमाने इतबारे करीत असल्याने त्यांची इतरत्र कुठल्याही विभागात बदली केली जात नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनीही गेल्या अनेक वर्षांपासून चांगलाच हात धुऊन घेतला आहे.
याबाबत मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, लसूण व्यापारी संतोष बाबू कोंदल यांच्याकडून पावत्यांच्या अदलाबदलीत झालेल्या व्यवहाराची चौकशी करु. यामध्ये जर आमचे कर्मचारी दोषी असतील, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
वाहतूक पोलिसांनाही दाद नाही
बाजारादिवशी मसाला, लसूण, कापड, फळे, भाजीपाला विक्रेते टेम्पोतून आपला माल आणतात. तो मुख्य रस्त्याच्या कडेला लावून विक्री करतात. ग्राहक खरेदी करतेवेळी येथे मोठी वाहतुकीची कोंडी होत असते. पालिकेचे कर्मचारी मात्र त्यांच्याकडून पैसे उकळून रस्त्यावर व्यवसाय करण्यास मुभा देतात. यामुळे हे व्यापारी वाहतूक पोलिसांनाही दाद देत नाहीत.
बाजार भाडेपट्टी वसुलीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार आहे. त्याच्या चौकशीसाठी नगरसेवकांची समिती गठित करावी. त्या समितीने वर्षातून दोन महिने किती बाजारभाडे जमा होते याचा आकडा काढावा. ज्या कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत पदाधिकारी, अधिकाऱ्यांना हाताशी धरुन मलिदा खाल्ला आहे, त्याची त्यांच्याकडून वसुली करावी. तसेच त्यांच्या मालमत्तेचीही चौकशी करावी. अन्यथा या भ्रष्टाचाराविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागू.
- विजय कुंभार, विरोधी पक्षनेते