इस्लामपूरकरांनी अनुभवली ऐन उन्हाळ्यात धुक्याची दुलई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:16 IST2021-03-30T04:16:08+5:302021-03-30T04:16:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : धुके पडणे ही तशी पावसाळा आणि थंडीच्या दिवसातील प्रक्रिया असते, असा समज आपल्याकडे आहे. ...

इस्लामपूरकरांनी अनुभवली ऐन उन्हाळ्यात धुक्याची दुलई
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : धुके पडणे ही तशी पावसाळा आणि थंडीच्या दिवसातील प्रक्रिया असते, असा समज आपल्याकडे आहे. मात्र ऐन उन्हाळ्यातही पडलेल्या दाट धुक्याने इस्लामपूर शहरवासीय आश्चर्यचकित झाले. सोमवारी पहाटेपासून सकाळी ७.३० वाजेपर्यंत साक्षात जमिनीवर ढगच अवतरल्याचा अनुभव देणारी धुक्याची दुुलई सगळ्या शहरावर पसरली होती.
पहाटेपासून व्यायाम आणि फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना धुक्याच्या दुलईचा हा अद्भुत नजराणा अनुभवता आला. हे धुके इतके दाट होते की, काही अंतरापर्यंत काहीच दिसत नव्हते. त्यामुळे या नागरिकांना अंदाज घेतच आपली पायपीट करावी लागत होती. अनेक वाहने सुद्धा धुक्याला छेदण्यासाठी दिवे लावूनच निघून जात असल्याचे चित्र होते. धुक्याच्या या अच्छादनामुुळे सकाळच्या वेळी हवेमध्ये गारठा निर्माण झाला होता.
हवेचे तापमान गोठणबिंदूपर्यंत आल्यावर धुके निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू होते. वातावरणातील विविध घटक, क्षार, प्रदूषित हवा आणि धुलिकण यांचा संयोग, उष्णतामानामुळे होणारे बाष्पीभवन आणि हवेतील तापमान कमी होण्याच्या प्रक्रियेतून दाट धुके तयार होते. पर्यावरणीय असंतुलन आणि तापमानातील अचानक होणाऱ्या बदलामुळे धुके पडते. गेल्या दोन-तीन दिवसांत उष्णतामानात झालेली प्रचंड वाढ आणि त्यासोबत हवेतील गारठ्यामध्येही वाढ झाल्याने ऐन उन्हाळ्याच्या दिवसातही धुके पडू शकते, अशी माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.