इस्लामपुरात ठकसेन मारुती जाधवने माजी सैनिकाला घातला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:31 IST2021-08-24T04:31:18+5:302021-08-24T04:31:18+5:30
इस्लामपूर : आर्थिक अडचणीचे कारण सांगत बहिणीला, तर चांगला आर्थिक परतावा देण्याचे आमिष दाखवत उरुण परिसरातील कष्टकरी महिलांची लाखो ...

इस्लामपुरात ठकसेन मारुती जाधवने माजी सैनिकाला घातला गंडा
इस्लामपूर : आर्थिक अडचणीचे कारण सांगत बहिणीला, तर चांगला आर्थिक परतावा देण्याचे आमिष दाखवत उरुण परिसरातील कष्टकरी महिलांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या ठकसेन मारुती जाधव याने एका माजी सैनिकालाही १७ लाख रुपयांचे घर देण्याचे आमिष दाखवत ५ लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. माजी सैनिकांनी त्याच्याविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली आहे.
विलास सदाशिव बजबळकर (वय ६०, रा. लोणार गल्ली) या माजी सैनिकांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मारुती अरुण जाधव याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला. त्याच्याविरुद्ध नोंद करण्यात आलेला हा फसवणुकीचा तिसरा गुन्हा ठरला आहे. दरम्यान, तेजश्री संजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीतील गुन्ह्याच्या तपासकामी येथील न्यायालयाने ठकसेन मारुती जाधवच्या पोलीस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ केली आहे.
मारुती जाधवने माजी सैनिक विलास बजबळकर यांना ऑक्टोबर २०१९ मध्ये माझा बंगला विकणार आहे. तो तुम्ही घेता का? अशी विचारणा करीत बंगल्याची किमत १७ लाख रुपये इतकी सांगितली. त्यावर बजबळकर यांनी बंगला घेण्याची तयारी दर्शवत ७ लाख रुपये दिले. मात्र, ही जागा सामायिक असल्याने खरेदीदस्त करण्यास अडचण निर्माण झाली. त्यावेळी जाधवने ही रक्कम बजबळकर यांना परत दिली.
फेब्रुवारी २०२० मध्ये मारुती जाधव हा या जागेतील सहहिस्सेदाराना घेऊन बजबळकर यांच्याकडे आला व त्यांचा विश्वास संपादन करून त्याने १७ लाख रुपयांत बंगला देण्याच्या नावाखाली बजबळकर यांच्याकडून ५ लाख रुपये घेतले. मात्र, त्याने हा व्यवहार पूर्ण न केल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विलास बजबळकर यांनी पोलिसात धाव घेतली. सहायक पोलीस उपनिरीक्षक जयपाल कांबळे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
चौकट
कांगावाखोर जाधव
माजी सैनिक विलास बजबळकर यांची फसवणूक करून घेतलेले ५ लाख रुपये न देण्याच्या उद्देशाने ठकसेन मारुती जाधव याने बजबळकर यांचा मुलगा विकास याच्यावरच ५ लाख रुपये खासगी सावकारी व्याजाने दिल्याची खोटी तक्रार सांगलीच्या गुन्हे अन्वेषण शाखेकडे केली होती. स्वत:च्या बहिणीसह राहत्या परिसरातीलच महिलांना गंडा घालणाऱ्या मारुती जाधवचा कांगावाखोरपणा यानिमित्ताने समोर आला.