इस्लामपुरात स्वच्छतेवरून राजकारण पेटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:27 IST2021-08-15T04:27:16+5:302021-08-15T04:27:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : इस्लामपूर पालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कोणाचाही धाक राहिलेला नाही. ठेकेदारांनाच कर्मचारी दम देतात, असा ...

इस्लामपुरात स्वच्छतेवरून राजकारण पेटले
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : इस्लामपूर पालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कोणाचाही धाक राहिलेला नाही. ठेकेदारांनाच कर्मचारी दम देतात, असा आरोप सत्ताधारी करत आहेत. दुसरीकडे ठेकेदाराकडून स्वच्छतेचे नियोजन केले जात नाही, सत्ताधारी कर्मचाऱ्यांवर अस्वच्छतेचे खापर फोडत आहेत, असा आरोप विरोधातील राष्ट्रवादी करत आहे. या राजकारणात मात्र डेंग्यू, ताप, चिकुनगुण्याची साथ वाढत आहे.
शहरात दोन दिवस कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेचे काम बंद केले होते. आता सत्ताधारी आणि विरोधकांनी राजकारण सुरू केले आहे. पंधरा वर्षांपासून शहराला कार्यक्षम स्वच्छता ठेकेदार मिळत नाही. त्यातच कर्मचाऱ्यांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. उपनगरात बेसुमार बांधकामे सुरू आहेत. त्या प्रमाणात सुविधांचा अभाव आहे. अपवाद वगळता बरेच नगरसेवक पालिकेकडे फिरकत नाहीत. प्रभागात भेटणेही दुर्मीळ झाले आहे. त्यामुळे गटारी, स्वच्छतागृहांमध्ये स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे.
शहरात वेळेवर औषध फवारणी केली जात नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डास उत्पत्तीने डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. यावर सत्ताधारी व विरोधक काहीच बोलत नाहीत. त्यामुळे कर्मचारीही शिरजोर झाले आहेत. सकाळी सातनंतरच ठराविक रस्त्यांची स्वच्छता सुरू होते. मुकादम एखाद्या चौकात दुचाकी उभी करून मोबाईलमध्ये डोके घालून बसतात. त्यामुळे स्वच्छतेचे तीन-तेरा वाजले आहेत.
चौकट
दारूच्या बाटल्यांचा खच
जुन्या बहे नाका येथील मुतारीमध्ये मोकळ्या दारूच्या बाटल्यांचा खच आहे. त्यालगतची गटार तुंबली आहे. तिच्यात प्लास्टिक आणि मोकळ्या बाटल्यांचा खच आहे.
कोट
साडेचार वर्षांत शहरातील स्वच्छतेचा अभाव आहे. त्यामुळे साथीचे रोग पसरले आहेत. सत्ताधारी मात्र कामगारांना दोष देत आहेत.
- शहाजी पाटील, पाणीपुरवठा सभापती.
कोट
कामगार काम करत नाहीत. दमबाजी करतात. त्यामुळे स्वच्छता होत नाही. त्यांच्यापुढे ठेकेदारही हतबल आहेत. त्यामुळे बाहेरील कामगार घेऊन स्वच्छता केली जात आहे.
विक्रम पाटील, पक्षप्रतोद