इस्लामपूर पोलीस राजकीय दबावाखाली
By Admin | Updated: January 28, 2016 00:14 IST2016-01-27T23:39:08+5:302016-01-28T00:14:50+5:30
गुन्हेगारीत वाढ : नूतन पोलीस निरीक्षकांपुढे वचक कायम राखण्याचे आव्हान

इस्लामपूर पोलीस राजकीय दबावाखाली
अशोक पाटील-- इस्लामपूर --माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी वाळवा तालुक्यातील सर्वसामान्यांना त्वरित न्याय मिळवून देण्यासाठी इस्लामपूर व आष्टा येथे अद्ययावत पोलीस ठाण्याच्या इमारती उभ्या केल्या. परंतु इस्लामपूरच्या पोलीस ठाण्यात येणारे अधिकारी राजकीय दबावाखाली राहून कर्तव्य पार पाडत असल्याने परिसरातील गुन्हेगारीचा आलेख वाढू लागला आहे. आता पोलीस निरीक्षकपदी नव्याने रूजू झालेल्या प्रताप मानकर यांच्यापुढे गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान आहे.
इस्लामपूर शहरासह तालुक्याची वाढती लोकसंख्या पाहता पोलिसांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना अपयश येत आहे. शहरातील जागांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे भूखंड माफिया सुपारी देऊन गुन्हे करण्यात पटाईत झाले आहेत. जाधव बंधू, बिल्डर राजेंद्र पाटील यांचे खून जागेच्या वादातूनच झाले आहेत. विकास आराखडा विकसित न झाल्याने आणेवारीच्या नावाखाली बेकायदेशीर भूखंड हडप करण्याचे प्रकार घडत आहेत. त्यात राजकीय नेत्यांचा हात आहे. त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी झाल्या आहेत. परंतु त्या राजकीय दबावाखाली कोठे गायब झाल्या, हे कळत नाही. त्यामुळे सर्वसामान्य लोक खरेदी केलेल्या जागेची कागदपत्रे घेऊन शासनदरबारी खेटे घालत आहेत.
खासगी सावकारी, मटका या व्यवसायाला पुन्हा ऊत आला असून, त्यात राजकीय नेत्यांचे बगलबच्चेच कार्यरत आहेत. काही फाळकूट दादा गु्रपच्या नावाखाली गुंडगिरी करतात, परंतु गु्रपचे नेते आपला त्याच्याशी संबंध नाही, अशी भूमिका घेताना दिसतात.
शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली असून, चौका-चौकात वाहतुकीची कोंडी नित्याचीच बनली आहे. शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी असलेली पोलिसांची संख्या अत्यल्प आहे. गुरुवार व रविवार हे आठवडी बाजाराचे दिवस असून, वाळवा बझार व अजिंक्य बझारसमोर वाहतुकीची कोंडी व बाजारकरूंची गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेऊन गळ्यातील दागिने व मोबाईलवर चोरटे हात मारत आहेत. बसस्थानकावर रोजच खिसे कापण्याचे प्रकार घडत आहेत. उपनगरांमध्ये कमी वस्ती असलेल्या ठिकाणी भुरट्या चोरांकडून चोऱ्या होत आहेत. पोलीस ठाण्यात एजंटांचा मोठा राबता असतो. गुन्हेगारीत अडकलेल्या संशयितांना सोडविण्यासाठी काही नेत्यांची तेथे वर्दळ असते.
या पार्श्वभूमीवर नुकतेच रूजू झालेल्या प्रताप मानकर यांना शहरासह उपनगरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
ग्रुप पुन्हा सक्रिय : नेत्यांचे हात वर
शहरात खासगी सावकारी, मटका या व्यवसायाला पुन्हा ऊत आला असून, त्यात काही राजकीय नेत्यांचे बगलबच्चेच कार्यरत आहेत. काही फाळकूट दादा काही नेत्यांच्या नावाखाली गु्रप तयार करून शहरात गुंडगिरी करतात, दहशत माजवितात, परंतु गु्रपचे नेते आपला त्याच्याशी संबंध नाही, अशी भूमिका घेताना दिसतात. यामुळे पोलिसांना कारवाई करताना मर्यादा येताना दिसत आहेत.
इस्लामपूर व परिसरातील बहुतांश गुन्ह्यांच्या तपासाच्या फायली अजूनही निकालात निघालेल्या नाहीत. त्या निकाली काढू. दहशत, गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी समाजप्रबोधन करणाऱ्या संघटनांची मदत घेऊन शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याला प्राधान्य देऊ.
- प्रताप मानकर, पोलीस निरीक्षक इस्लामपूर.