राष्ट्रवादीच्या पाडावासाठी जिल्हा परिषदेतही ‘इस्लामपूर पॅटर्न’
By Admin | Updated: December 22, 2016 00:03 IST2016-12-22T00:03:51+5:302016-12-22T00:03:51+5:30
सदाभाऊ खोत : राष्ट्रवादीकडून धाक-दडपशाहीचे राजकारण; मौजे डिग्रज येथे विविध कामांचे उद्घाटन

राष्ट्रवादीच्या पाडावासाठी जिल्हा परिषदेतही ‘इस्लामपूर पॅटर्न’
कसबे डिग्रज : गेली कित्येक वर्षे इस्लामपूरसह संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादीने धाक-दडपशाही केली होती. त्यामुळे सामान्य जनतेत संतप्त वातावरण होते. त्याचा उद्रेक इस्लामपूरमध्ये झाला. राष्ट्रवादीविरोधात सर्वपक्षीय आघाडीचा पॅटर्न आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी राबवून राष्ट्रवादीचा पाडाव करणार असल्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले.
मौजे डिग्रज (ता. मिरज) येथील ग्रामपंचायत, विकास सोसायटी यांच्यावतीने सत्कार व समाजमंदिरासह विविध विकास कामांचे उद्घाटन, असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
खोत म्हणाले की, सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी आता राष्ट्रवादीला सर्व सत्तास्थानांवरून खेचणे गरजेचे आहे. त्यामुळेच विरोधकांनी एकत्र आले पाहिजे.
खासदार राजू शेट्टी म्हणाले, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनेक सत्तास्थाने बळकावून सामान्य जनतेला मोठा त्रास दिला जात होता. त्यामुळे इस्लामपूर नगरपालिकेत सर्वपक्षीयांनी आघाडी केली. त्यामुळे जनतेनेच मक्तेदारी मोडून काढली आहे. जनतेवर अन्याय करणारी प्रवृत्ती आता जिल्ह्यातून हद्दपार करण्याची संधी जिल्हा परिषद निवडणुकीत मिळणार आहे.
आमदार मोहनराव कदम म्हणाले, सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून काम केल्यास जनता पाठीशी राहते. आगामी जिल्हा परिषदेसाठी कॉँग्रेस दमदारपणे लढणार आहे. जनतेच्या मनातील भावना ओळखणे ही व्यासपीठावरील नेत्यांची जबाबदारी आहे. इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील म्हणाले, इस्लामपूरच्या जनतेने राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला चपराक दिली आहे.
शिवसेनेचे पृथ्वीराज पवार म्हणाले, सर्वोदय कारखाना सभासदांच्याच मालकीचा राहावा यासाठी गेले कित्येक दिवस धनशक्तीबरोबर लढाई सुरु होती. लवकरच ‘सर्वोदय’ची निवडणूक लढणार आहे.
यावेळी नगरसेवक सुरेश आवटी, सोसायटी अध्यक्ष मोसीन पिंजारी, कुमार पाटील, पद्माळेचे सरपंच संग्राम पाटील, संयोगीता कोळी, विशाल चौगुले, श्रीपाल चौगुले उपस्थित होते. उपसरपंच शीतल चौगुले यांनी स्वागत केले. नायगोंडा पाटील यांंनी आभार मानले. (वार्ताहर)
ंआघाडीस प्रतिसाद...
सदाभाऊ खोत यांनी इस्लामपुरातील आघाडीचा पॅटर्न जिल्हा परिषद निवडणुकीत राबविण्याचा विचार मांडल्यानंतर त्यांनी स्टेजवरील नेत्यांकडे कटाक्ष टाकला. त्यावेळी कॉँग्रेसचे नेते मोहनराव कदम, जयश्रीताई पाटील, खा. राजू शेट्टी, शिवसेनेचे पृथ्वीराज पवार या सर्व नेत्यांनी त्यांना प्रतिसाद देत इशाऱ्यानेच जिल्हा परिषदेतील संभाव्य आघाडीला संमती दर्शविली.