कल्पिता पिंपळे हल्ल्याचा इस्लामपूर पालिका कर्मचाऱ्यांकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:56 IST2021-09-02T04:56:43+5:302021-09-02T04:56:43+5:30
इस्लामपूर येथे उपमुख्याधिकारी प्रमिला माने-पाटील यांनी नायब तहसीलदार धनश्री भांबुरे यांना निवेदन दिले. या वेळी साहेबराव जाधव, रश्मी पोळ, ...

कल्पिता पिंपळे हल्ल्याचा इस्लामपूर पालिका कर्मचाऱ्यांकडून निषेध
इस्लामपूर येथे उपमुख्याधिकारी प्रमिला माने-पाटील यांनी नायब तहसीलदार धनश्री भांबुरे यांना निवेदन दिले. या वेळी साहेबराव जाधव, रश्मी पोळ, सतीश दंडवते उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा निषेध करत येथील नगरपालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. तसेच यातील हल्लेखोराविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
येथील पालिका आवारात उपमुख्याधिकारी प्रमिला माने-पाटील, आरोग्य अधिकारी साहेबराव जाधव, कामगार संघटनेचे अधिक इंगळे, अभियंता विजय पाटील, शांतीप्रसाद पुंदे, सतीश दंडवते यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. त्यानंतर नायब तहसीलदार धनश्री भांबुरे यांना निवेदन देण्यात आले.
प्रमिला माने-पाटील म्हणाल्या, कल्पिता पिंपळे या अतिक्रमणविरोधी पथक घेऊन बेकायदेशीर हातगाड्यांवर कारवाई करीत होत्या. त्या वेळी त्यांच्यावर हा हल्ला झाला. एका महिला अधिकाऱ्यावर अशा प्रकारचा हल्ला होणे ही चिंताजनक बाब आहे. शासकीय कर्तव्य बजावत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक हल्ले करतात त्या वेळी अधिकारी आणि प्रशासनाच्या मनोधैर्यावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे या हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी.
या हल्ल्याच्या निषेधार्थ पालिका कर्मचारी संघटनेने एक दिवस काम बंद ठेवले होते. या खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात घेऊन हल्लेखोरास कठोर शिक्षा करावी, अशी मागणी अधिक इंगळे यांनी केली.
या वेळी अजित पाटील, अरुण घोंगडे, सुलोचना माळी, अनिकेत हेंद्रे, अमिर मुंडे, रणजीत ओगले, अनिल कांबळे, विजय टेके, रश्मी पवळ, अनघा दिवाण, दिलीप उरुणकर, श्रीकांत बारटक्के आदी उपस्थित होते.