इस्लामपूर घरकुल योजनेचा बोजवारा

By Admin | Updated: July 27, 2015 00:21 IST2015-07-26T22:01:40+5:302015-07-27T00:21:48+5:30

हितसंबंधातून कार्यकर्त्यांना वाटप : घरकुल उभे राहिले; परंतु खरे लाभार्थीच वंचित

Islampur Gharkul Yojana to be canceled | इस्लामपूर घरकुल योजनेचा बोजवारा

इस्लामपूर घरकुल योजनेचा बोजवारा

अशोक पाटील - इस्लामपूर शहरातील दारिद्र्यरेषेखाली असलेले नागरिक आणि ज्यांना राहण्यासाठी घरे नाहीत, अशा गोरगरिबांना वंचित ठेवून, श्रीमंत परंतु हितसंबंधात गुंतलेल्यांनाच घरे वाटप करण्यात आली आहेत. मुळातच घरकुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. बांधलेली घरे असुरक्षितच बनली आहेत. तरीसुध्दा रमाई
आवास योजनेंतर्गत घरकुल योजनेचा प्रारंभ म्हणजे सत्ताधारी ताक घुसळून लोणी खात असल्याची चर्चा सर्वसामान्यांतून आहे.
शहरात सध्या ४०३ घरकुले तयार आहेत. त्यांचे वाटपही करण्यात आले आहे. महादेवनगर परिसरात बांधलेल्या घरकुलात दहा टक्केही कुटुंबे राहण्यास आली नाहीत. काही घरे ओस पडली आहेत, तर काही घरांचा गैरवापरही केला जातो. याठिकाणी अद्यापही लाईट, पिण्याच्या पाण्याची सोय नाही. काही घरांचे बांधकामही ढासळलेले आहे. याचठिकाणी बांधलेल्या भाजी मार्केटची दुरवस्था झाली आहे.
महादेवनगर परिसरातील घरकुलाची दयनीय परिस्थिती असताना, एकात्मिक गृहनिर्माण योजनेंतर्गत कापूसखेड रस्त्यावरील स्मशानभूमीलगत ३९५ घरे उभी राहिली आहेत. या ठिकाणीही जमिनीला धर लागत नसतानाही घरकुले उभी केली आहेत. त्यांचे वाटपही करण्यात आले आहे. यामध्येही बोगस लाभार्थी असलेल्यांची संख्या मोठी आहे, तर काही कुटुंबांनी स्वखर्चाने दुरुस्त्या करून घरकुले ताब्यात घेतली आहेत. यातील काही घरकुले ओस पडली आहेत.
बांधलेल्या घरकुलांची अवस्था मेडक्याच्या छपरासारखी असताना, केंद्र शासनाच्या योजनेसाठी १ कोटी ५३ लाख रुपये अनुदान उपलब्ध
झाले आहे. या रकमेतून १०२ घरकुले उभी राहणार आहेत. या घरकुलांचेही वाटप नियमबाह्य केल्याची चर्चा आहे. या दारिद्र्यरेषेखालील यादीचा फेरसर्व्हे करावा, अशीही मागणी जोर धरू लागली आहे. एकूणच राजकीय नेत्यांच्या मनमानी कारभारामुळे
घरकुल योजनांचा मात्र बोजवारा उडाला आहे.

बाबांची गृहनिर्माण संस्था..!
उपजिल्हा रुग्णालय परिसरात भाजपचे बाबा सूर्यवंशी यांनी गोरगरिबांसाठी गृहनिर्माण योजना उभी करण्याचा प्रयत्न केला. यासाठी गरीब महिलांकडून लाखो रुपये अनामत रक्कम म्हणून जमाही केले. परंतु सत्ताधारी राष्ट्रवादीने न्यायालयीन बाब करून गृहनिर्माण संस्थेचा भूखंड शासनाच्या ताब्यात दिल्याने, राजकीय नेत्यांच्या वादात गोरगरीब महिलांच्या घराच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.
शहरात सध्या ४०३ घरकुले तयार आहेत. त्यांचे वाटपही करण्यात आले आहे. महादेवनगर परिसरात बांधलेल्या घरकुलात दहा टक्केही कुटुंबे राहण्यास आली नाहीत. परिसरात अद्यापही वीज, पाणी, रस्ते आदी मूलभूत सुविधांची वानवा आहे. कापूसखेड रस्त्यावरील स्मशानभूमीलगतही ३९५ घरकुले उभी आहेत. त्यांचेही वाटप झाले आहे. यामध्ये बोगस लाभार्यांचाच भरणा असल्याची चर्चा आहे.

Web Title: Islampur Gharkul Yojana to be canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.