इस्लामपूर बसस्थानकात खिसेकापूस नागरिकांनी दिला चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:24 IST2021-03-24T04:24:58+5:302021-03-24T04:24:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : येथील बसस्थानकावर असलेल्या गर्दीचा फायदा उठवत ३० हजार रुपयांच्या रकमेवर डल्ला मारणाऱ्या खिसेकापूस ...

इस्लामपूर बसस्थानकात खिसेकापूस नागरिकांनी दिला चोप
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येथील बसस्थानकावर असलेल्या गर्दीचा फायदा उठवत ३० हजार रुपयांच्या रकमेवर डल्ला मारणाऱ्या खिसेकापूस शिताफीने पकडून नागरिकांनी चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. ही घटना सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.
सचिन बाळासाहेब निगडे (वय ३५, रा. बैलबाजार, कराड) असे पोलिसांनी अटक केलेल्या खिसेकापूचे नाव आहे. आसिफ शमशुद्दीन तांबोळी (रा. शिराळा नाका, इस्लामपूूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबतची माहिती अशी की, तांबोळी हे कांदा-बटाटा व्यापारी आहेत. आज सकाळी साडेआठच्या सुमारास आजीला सोडण्यासाठी बसस्थानकात आले होते. सांगलीकडे जाणाऱ्या बसमध्ये आजीला बसवत असताना गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेऊन सचिन निगडे याने त्यांच्या खिशातील तीस हजारांची रोकड काढून घेतली. तांबोळी यांना त्याची जाणीव झाल्याने त्यांनी पाठीमागे असणाऱ्या निगडेवर नजर ठेवली.
खिसा मारल्यानंतर निगडे हा बाजूच्या एसटीमध्ये जाऊन बसला. त्यानंतर पाचच मिनिटांत खाली उतरून त्याने स्वच्छतागृहाकडे धाव घेतली. तेथे गेल्यानंतर निगडे याने ही रक्कम स्वच्छतागृहात ठेवली होती. तो बाहेर आल्यावर तांबोळी यांनी त्याला पैशाची मागणी करताच तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यानंतर इतर प्रवाशांच्या साथीने त्याला चोप दिल्यावर निगडे याने स्वच्छतागृहात ठेवलेली रक्कम तांबोळी यांच्याकडे दिली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले.