इस्लामपूर बाजार समितीतील रस्ते पोरके!
By Admin | Updated: March 28, 2015 00:02 IST2015-03-27T23:09:54+5:302015-03-28T00:02:08+5:30
पालिकेची खेळी : अनेक वर्षांपासून दुरूस्तीच नाही; प्रश्नाची नुसतीच टोलवाटोलवी

इस्लामपूर बाजार समितीतील रस्ते पोरके!
अशोक पाटील - इस्लामपूर --इस्लामपूरच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बाजार समितीतील मुख्य रस्ते अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. नगरपालिका प्रशासनाने, कृषी उत्पन्न बाजार समितीनेच हे रस्ते करावेत, असे आवाहन केले आहे, तर बाजार समिती रस्त्याबाबत नगरपालिकेकडेच बोट दाखवत आहे. त्यामुळे या रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. बहुतांशी व्यापाऱ्यांनी तेथे व्यवसाय न करता घरे बांधून राहणेच पसंत केले आहे. काहींनी पोटभाडेकरु ठेवून जागा भाड्याने दिल्या आहेत. अशा व्यापाऱ्यांवर बाजार समितीने कोणतीच कारवाई केलेली नाही. बाजार समितीने २९ वर्षांच्या कराराने या जागा दिल्या आहेत. परंतु ५0 टक्क्याहून अधिक जागा मालकांनी व्यापार न करता तेथे राहण्याला प्राधान्य दिले आहे.
त्यांच्या जागा बाजार समितीने काढून घेऊन व्यापार करणाऱ्यांना द्याव्यात, अशी मागणी होत आहे. बाजार समितीमध्ये ज्यांना जागा मिळाल्या आहेत, त्यांना राजकीय वरदहस्त आहे. त्यामुळेच बेकायदेशीर प्रकार घडत आहेत. बाजार समितीत अंतर्गत व मुख्य रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे.
पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहात असल्याने रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.
मुख्य गावातील आठवडा बाजारादिवशी (गुरुवार व रविवार) बाजार समितीच्या ावारातील रस्त्यांचा वापर केला जातो. हे रस्ता दुरुस्त करण्यासाठी नगरपालिकेकडून कोणतेही प्रयत्न होत नाहीत. उलट हे रस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीनेच करावेत, असा अलिखित नियमही केला आहे. बाजार समितीकडे रस्ते करण्यासाठी मोठा निधी उपलब्ध नसल्याने, हा रस्ता दुरुस्तीपासून पोरका झाला आहे.
वैभवराव, हे दिसत नाही का ?
बाजार समिती आवारात एम. डी. पवार आॅईल मिल, एम. डी. पवार मंगल कार्यालय आहे. माजी नगराध्यक्ष एम. डी. पवार यांचे नातू वैभव पवार येथील सर्व कारभार पाहतात. शहरात सुरु असलेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्तेकामावर पवार व त्यांचे बंधू विजय पवार हे दोघे आवाज उठवत आहेत. परंतु त्यांच्या कार्यक्षेत्रातील उद्ध्वस्त झालेला रस्ता का दिसत नाही?, असा सवाल व्यापाऱ्यांतून होत आहे.
हा रस्ता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ताब्यात असला तरी, येथील व्यापारी संकुल आणि येथे राहण्यास असलेल्यांकडून सर्व करांची आकारणी ही नगरपालिकेकडून केली जाते. त्यामुळे बाजार समिती आवारातील रस्त्यांचेही काम नगरपालिकेच्या फंडातूनच व्हावे.
- आनंदराव पाटील, सभापती, बाजार समिती, इस्लामपूर