इस्लामपुरात रुग्णालय फोडले

By Admin | Updated: July 13, 2014 01:09 IST2014-07-13T01:03:32+5:302014-07-13T01:09:29+5:30

आठ हजार लंपास : भरदिवसा चोरट्याचा डल्ला

Islamophobia hospitalized | इस्लामपुरात रुग्णालय फोडले

इस्लामपुरात रुग्णालय फोडले

इस्लामपूर : शहर आणि परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढत असतानाही गाफील राहिलेल्या पोलिसांच्या निष्क्रियतेचा फायदा उठवत सराईत चोरट्याने कोल्हापूर नाक्यावरील रुग्णालय भरदिवसा फोडले. चोरट्याने स्क्रू ड्रायव्हरचा वापर करीत दुपारी पावणेदोनच्या सुमारास दरवाजा आणि ड्रॉवर उचकटून त्यातील आठ हजारांची रोकड लांबवली. चोरट्याच्या धाडसी कामगिरीनंतर या चोरीची पोलिसांच्या गुन्हे नोंदवहीत कच्ची नोंद करण्यात आली!
येथील शिवपार्वती चित्रमंदिर परिसरात डॉ. गिरीष गणतपराव देशमुख (रा. विनायकनगर) यांचे रुग्णालय आहे. ८ जुलैरोजी दुपारी दीडच्या सुमारास ते केबीन बंद करून जेवणासाठी घरी गेले. त्यानंतर दहा मिनिटांनी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने रुग्णालयाच्या खालच्या मजल्यावर असणाऱ्या सायकल दुकानदाराकडून डॉक्टरांनी स्क्रू ड्रायव्हर मागितला आहे, अशी बतावणी करीत तो घेतला.
चोरट्याने वर जाऊन पहिल्यांदा केबीनचा दरवाजा उचकटला. त्यानंतर डॉक्टरांच्या टेबलच्या ड्रॉवरचे कुलूपही उचकटले आणि त्यातील आठ हजारांची रोकड ताब्यात घेतली. तेथून जाताना त्याने दुकानदाराचा स्क्रू ड्रायव्हर वरूनच दुकानात टाकला आणि दुचाकीवरून पलायन केले.
डॉ. देशमुख यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन चोरट्याची माहिती, वर्णन घेतले आणि हा गुन्हा तसाच वरच्यावर ठेवण्याची कामगिरी पार पाडली. याबाबत इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)

Web Title: Islamophobia hospitalized