इस्लामपूर पालिकेतील सत्ताधारी खोटेच बोलतात
By Admin | Updated: July 28, 2015 00:30 IST2015-07-28T00:19:25+5:302015-07-28T00:30:27+5:30
विजय कुंभार : कारभाऱ्यांची हुकूमशाही, शहरातील विकासकामांची वाईट स्थिती

इस्लामपूर पालिकेतील सत्ताधारी खोटेच बोलतात
अशोक पाटील - इस्लामपूर पालिकेत सत्ताधारी राष्ट्रवादी आणि त्यांचे शासकीय नियुक्त सत्तावीसावे मुख्याधिकारी नीलेश देशमुख म्हणजे ‘हायफाय’ योजनेचे पुरस्कर्ते आहेत. चार वर्षात विकास कामांची वाईट अवस्था झाली आहे. राष्ट्रवादीतील मतभेदाचा फायदा घेऊन हेच हायटेक मुख्याधिकारी पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांना चुकीचा सल्ला देतात. त्यामुळेच सत्ताधारी खोटे बोलतात, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
कुंभार म्हणाले, रस्ते, गटारी, वाहतूक, आरोग्य, नागरी सुविधांपासून शहर शेकडो मैल दूर आहे. गेल्या साडेचार वर्षात सत्ताधाऱ्यांचा कारभार पाहता, मुख्याधिकारी देशमुख यांनी बेकायदेशीर कामे कायदेशीर केली आहेत. विकासकामांवरील खर्चापेक्षा प्रशासकीय खर्च प्रचंड वाढवला आहे. मंजुर आकृतीबंधापेक्षा अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा भरणा केला आहे. प्रशासकीय बदल्यांच्या नावाखाली बेकायदेशीर अंतर्गत बदल्या केल्या आहेत. पालिकेचा अर्थसंकल्प वास्तववादी न करता रकमांची तोंडमिळवणी केली आहे.
शासकीय लेखापरीक्षणातील आक्षेप याच मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यकाळात वाढले आहेत. त्यातील काही दोष वरिष्ठ अधिकाऱ्यांना खूष करून दुरुस्त करुन घेतले आहेत. शासनाच्या विविध विकास कामांसाठी आलेला निधी विकास कामांवर खर्च करण्यापेक्षा हायफाय जाहिराती व सर्व्हे करणाऱ्या एजन्सीवर खर्च करुन नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेकली आहे. २४ बाय ७ पाणी पुरवठा योजनेसाठी आलेला निधी संपूर्ण सर्व्हे एजन्सीवर खर्च केल्याचे दिसते. शहरातील वायफाय सेवा सुरू होण्यापूर्वीच त्याचा गाजावाजा सुरू आहे. वास्तविक पाहता, ही सेवा बी.एस.एन.एल. कडून घेणे गरजेचे असताना, नगरपालिकेने खासगी कंपनीची सेवा कार्यरत करण्याचा घाट घातला आहे, असे ते म्हणाले.
दलित वस्तीअंतर्गत मिळणारा निधी सहायक संचालक नगररचना सांगली आणि जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाची मंजुरी घेऊन इतर विकास कामांसाठी बेकायदेशीररित्या वापरला जातो, असा आरोपही कुंभार यांनी केला.
खासगी पुरस्कार...
पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांनी पाणी पुरवठा पुरस्काराबाबत विरोधकांना चिमटे काढले, यावरून त्यांचे अज्ञान दिसून येते. हा पुरस्कार शासनाचा असल्याचे सांगून दिशाभूल केली आहे. खासगी नोंदणीकृत फौंडेशनचा हा पुरस्कार आहे. असे पुरस्कार राज्यातील बाजारात विकत मिळतात, असा आरोपही कुंभार यांनी केला आहे.
मुख्याधिकारी देशमुख यांना आघाडी शासनाने सहा महिने मुदतवाढ दिली आहे. त्यांचा ३ वर्षांचा कार्यकाल केव्हाच पूर्ण झाला आहे. नगरविकासच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांनी मुक्काम वाढविला आहे. याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली असून, त्यांची बदली निश्चित आहे. बदली न झाल्यास आपण राजकारण सोडू.
- विक्रम पाटील, प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा
भारतीय दूरसंचार निगमच्या विविध योजना यशस्वीपणे कार्यान्वित आहेत. ब्रॉडबँड व वाय-फाय सेवा विनातक्रार व माफक दरात उपलब्ध आहेत. मात्र इस्लामपूर पालिकेने वाय-फाय योजनेसाठी आमच्याकडे कोणताही प्रस्ताव दिला नाही. प्रस्ताव दिला असता, तर मंजुरीसाठी तो वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला असता.
- प्रकाश पाटील, मंडल अधिकारी, बी.एस.एन.एल., इस्लामपूर