इस्लामपुरात नगराध्यक्षांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2016 00:55 IST2016-09-15T00:55:28+5:302016-09-15T00:55:28+5:30

सुभाष सूर्यवंशी जखमी : हल्लेखोर पसार; कोयता हिसकावून घेतल्याने अनर्थ टळला

Islam Shah attacked | इस्लामपुरात नगराध्यक्षांवर हल्ला

इस्लामपुरात नगराध्यक्षांवर हल्ला

इस्लामपूर : इस्लामपूर शहराचे नगराध्यक्ष सुभाष यशवंत सूर्यवंशी (वय ५४) यांच्यावर बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास एकाने कोयत्याने हल्ला चढविला. पूर्ववैमनस्यातून झालेल्या या खुनी हल्ल्यात सूर्यवंशी यांच्या मानेवर वार झाला. यावेळी हल्लेखोराशी झालेल्या झटापटीत त्यांचा चालकही जखमी झाला आहे.
हल्लेखोराने सूर्यवंशी यांच्या दुचाकीला पाठीमागून येऊन धडक देऊन भर रस्त्यावर हा हल्ला केल्याने शहरात खळबळ माजली होती. हल्लेखोराने दुचाकीवरून पलायन केले.
जितेंद्र बापू सूर्यवंशी (वय ३०, रा. बुरूड गल्ली, इस्लामपूर) असे हल्लेखोराचे नाव आहे. नगराध्यक्ष सुभाष यशवंत सूर्यवंशी (वय ५४, रा. बुरूड गल्ली, इस्लामपूर) यांच्यासह चालक सिद्धार्थ सावंत (वय ३०, रा. इस्लामपूर) हे सुद्धा जखमी झाले आहेत. दोघांवर यल्लम्मा चौकातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेतील सत्ताधारी गटाचे ज्येष्ठ नेते विजयभाऊ पाटील, शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शहाजी पाटील, नगरसेवक खंडेराव जाधव, आयुब हवालदार, सुभाष देसाई, डॉ. संग्राम पाटील, मानसिंग पाटील, रवींद्र सूर्यवंशी, संभाजी कुशिरे, संदीप माने, संदीप पाटील यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. सूर्यवंशी यांचे कुटुंबीय, नातेवाईक व समर्थक कार्यकर्त्यांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती.
हल्लेखोर जितेंद्र सूर्यवंशी आणि नगराध्यक्षांच्या नात्यातील मुलांचा वाद झाला होता. सहा महिन्यांपूर्वी झालेला हा वाद मिटविण्यात आला होता. मात्र, जितेंद्र सूर्यवंशी हा या भांडणाचा राग मनात धरूनच होता. त्यातूनच त्याने दोन महिन्यांपूर्वी नगराध्यक्ष सूर्यवंशी यांच्या घरालगतच्या कार्यालयातही तोडफोड केली होती. तसेच वाहनाच्या काचाही फोडल्या होत्या. मात्र, नगराध्यक्ष सूर्यवंशी यांनी या घटनांकडे कानाडोळा केला.
बुधवारी सायंकाळी नगराध्यक्ष सूर्यवंशी हे पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांच्यासमवेत पालिकेत थांबले होते. जिल्ह्यातील सर्व नवीन नगरपंचायती व नगरपालिकांच्या कामकाजासंदर्भात जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी राजारामबापू नाट्यगृहात बैठक घेतली होती. या बैठकीस उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना अंबिका उद्यान दाखविण्यासाठी सूर्यवंशी हे सर्वांसोबत उद्यानाकडे गेले. तेथून साडेसहाच्या सुमारास ते सिद्धार्थ सावंत याला बरोबर घेऊन दुचाकीवरून पालिकेकडे येत होते. त्यावेळी जितेंद्र सूर्यवंशी याने दुचाकीवरून पाठीमागून येऊन पोस्ट परिसरात सूर्यवंशी यांच्या दुचाकीला धडक दिली.
या धडकेत हल्लेखोर जितेंद्र याचीच दुचाकी घसरून पडली. त्यानंतरही त्याने आपल्याकडील कोयत्याने नगराध्यक्षांच्या मानेच्या उजव्या बाजूवर वार केला. हा वार मान आणि कानाच्या पाठीमागे बसल्याने सूर्यवंशी रक्तबंबाळ झाले. त्याचवेळी सिद्धार्थ सावंत याने धाडसाने हल्लेखोराकडील कोयता काढून घेतल्याने सूर्यवंशी बचावले. या झटापटीत सिद्धार्थच्या बोटांना गंभीर जखमा झाल्या. ही झटापट होत असतानाही जितेंद्र सूर्यवंशी हा रिव्हॉल्व्हर आणा, असे ओरडत होता. त्यानंतर त्याने पलायन केले. घटनेनंतर जखमी अवस्थेतच नगराध्यक्ष सूर्यवंशी यांनी कोयत्यासह पोलिस ठाण्यात धाव घेत पोलिसांना घटनेची माहिती दिली.
पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी घटनेची गंभीर दखल घेत हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांना आदेश दिले. रुग्णालयात येऊन जखमींची विचारपूस केली. रात्री उशिरा नगराध्यक्ष सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली. (वार्ताहर)
\

सुपारी हल्ल्याची शक्यता..!
या खुनी हल्ल्यात जखमी नगराध्यक्ष सूर्यवंशी यांनी पोलिसांशी बोलताना, या हल्ल्यामागे कोणाची तरी फूस असावी, अशी शंका व्यक्त केली. सूर्यवंशी हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. मात्र, त्यांच्यावरील खुनी हल्ल्यानंतर राजकीय वर्तुळासह शहरात खळबळ माजली आहे.. हल्लेखोर जितेंद्र सूर्यवंशी याच्यावर यापूर्वी गंभीर मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत.
गुरुवारी निषेध सभा : नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या भ्याड खुनी हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी दहा वाजता यल्लम्मा चौकात शहरवासीयांच्यावतीने निषेध सभेचे आयोजन केल्याचे पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांनी सांगितले. या घटनेचा निषेध करण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

Web Title: Islam Shah attacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.