शंभूराज देसाई कोयना धरणाचे मालक आहेत का?, खासदार संजय पाटील यांचा सवाल
By अविनाश कोळी | Published: November 25, 2023 06:33 PM2023-11-25T18:33:21+5:302023-11-25T18:34:29+5:30
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली तक्रार
सांगली : कोयना धरणातील पाणी अडविणारे साताराचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे मालक लागून गेले का, असा सवाल भाजपचे सांगलीचे खासदार संजय पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान पाण्याच्या प्रश्नासाठी प्रसंगी खासदारकीचा राजीनामा देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.
पाटील म्हणाले की, कोयना धरण शंभूराज यांच्या सात-बाऱ्यावर नोंदलेले नाही. त्यांनी मालकीहक्क गाजवू नये. अशा अडेलतट्टू भूमिकेचा आम्ही निषेध करीत आहोत. कोयना धरणाच्या पाण्यावरुन कधीच असा वाद इतिहासात घडला नाही. देसाईंचा या पाण्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही पाणी सोडण्याबाबत अधिकाऱ्यांना सक्त ताकीद देण्याची मागणी केली आहे. देसाई यांचे ऐकून पाणी अडविणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे, यासाठी आम्ही आग्रही राहू.
सांगली जिल्ह्यातील जनतेने मला खासदार बनविले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रश्नासाठी खासदारकी पणाला लावू. सांगली जिल्ह्याच्या वाट्याला एकूण ३२ टीएमसी पाणी आहे. पुढील जून महिन्यापर्यंत टप्प्याटप्प्याने पाणी सोडणे अधिकाऱ्यांना क्रमप्राप्त आहे. त्यामुळे अशी आडकाठी यापुढे आम्ही चालू देणार नाही. पालकमंत्र्यांना पाणी अडविण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी अशी कृती केल्यास योग्य त्या पद्धतीने उत्तर देऊ, असा इशारा पाटील यांनी दिला.
अमित शहांकडे तक्रार
पाटील म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे नेते अमित शहा यांच्याकडे देसाई यांच्याबाबत तक्रार केली आहे. तक्रारीनुसार त्यांना ताकीद दिली नाही, तर खासदारकीचा राजीनामा देऊ. टोकाची भूमिका घेण्याचीही माझी तयारी आहे. देसाई यांच्याकडून पालकमंत्रीपद काढून घेण्याची मागणीही केली आहे.
बाबर यांच्यावरही टीका
आमदार अनिल बाबर यांनी पाणी सोडण्याची मागणी करण्याची मुख्यमंत्री वाट पहात होते का, असा सवाल पाटील यांनी केला. सांगलीला पाणी सोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी पाण्याचे दान दिलेले नाही. हक्काच्या पाण्यासाठी अशा आदेशाची गरजच काय, असा सवालही पाटील यांनी केला.