सावळजच्या बाळू लोखंडेंची लोखंडी खुर्ची सातासमुद्रापार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:28 IST2021-09-26T04:28:35+5:302021-09-26T04:28:35+5:30
फोटो : २५०९२०२१ एसएएन०१ : लंडनच्या मँचेस्टरमधील रेस्टॉरंटमध्ये असलेली खुर्ची. तासगाव (जि. सांगली) : सावळज (ता. तासगाव) येथील मंडप ...

सावळजच्या बाळू लोखंडेंची लोखंडी खुर्ची सातासमुद्रापार
फोटो : २५०९२०२१ एसएएन०१ : लंडनच्या मँचेस्टरमधील रेस्टॉरंटमध्ये असलेली खुर्ची.
तासगाव (जि. सांगली) : सावळज (ता. तासगाव) येथील मंडप व्यावसायिक बाळू लोखंडे यांच्या लोखंडी खुर्चीची चर्चा सातासमुद्रापार व्हायरल झाली आहे. याला निमित्त ठरले आहे, ते ज्येष्ठ क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ.
लंडनच्या मँचेस्टरमधील अल्ट्रिक्म भागात फिरत असताना त्यांना एका रेस्टाॅरंटच्या परिसरात एक लोखंडी खुर्ची दिसली. या खुर्चीच्या मागे ‘बाळू लोखंडे, सावळज’ असे नाव लिहिले आहे. लेले यांनी त्याच लोखंडी खुर्चीचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. काही तासातच व्हीडीओ तुफान व्हायरल झाला आणि एकच चर्चा सुरू झाली. सावळज येथील मंडप व्यावसायिक बाळू लोखंडेंची लोखंडी खुर्ची तब्बल ७ हजार ६२७ किलोमीटरचा प्रवास करून इंग्लंडमधील मँचेस्टरच्या हाॅटेलात कशी पोहोचली, याबाबत नेटकऱ्यांनी अनेक विनोदी तर्कवितर्क लढवायला सुरुवात केली आहे.
सामान्य कुटुंबातील बाळू लोखंडे यांनी १५ वर्षांपूर्वी स्वत:चा मंडप उभारणी व सजावटीचा व्यवसाय सुरू केला होता. अनेक कार्यक्रमांत जेवणासाठी टेबल व खुर्चीची मागणी व्हायला लागली. मंडप व्यवसायास जोडधंदा म्हणून केटरिंगचे साहित्यही आणले. त्यामध्ये लोखंडी खुर्च्या होत्या. या खुर्च्या त्यांनी १५ वर्षांपूर्वी हुबळी (कर्नाटक) येथून घेतल्या होत्या. एका खुर्चीचे वजन १३ किलो होते. वजनाने जड लोखंडी खुर्च्या, नंतर हाताळण्यासही जड वाटू लागल्या. काळाच्या ओघात ग्राहकही प्लॅस्टिक खुर्च्यांची मागणी करू लागले होते. यामुळे काही वर्षांपूर्वी त्यांनी लोखंडी खुर्च्या कवठेमहांकाळ (जि. सांगली) येथे भंगारात १० रुपये किलो दराने विकून टाकल्या. काही खुर्च्या आजही आठवण म्हणून जपून ठेवल्या आहेत. भंगारात विकलेल्या या खुर्च्या पुढे मुंबईपर्यंत गेल्या. नंतर एका परदेशी व्यावसायिकाने दुर्मीळ खुर्च्या म्हणून त्या विकत घेतल्या. पूर्वीच्या काळातील लोखंड मजबूत असल्यामुळे यापैकी काही खुर्च्या मँचेस्टरच्या रेस्टॉरंट मालकाने विकत घेतल्या. त्याच खुर्च्या ग्राहकांना बसायला ठेवल्या आहेत.
चौकट
सुनंदन लेलेंचा लंडनमधूनच बाळू लोखंडेंना फोन
बाळू लोखंडेंची लोखंडी खुर्ची लंडनमध्ये पाहिल्यानंतर सुनंदन लेलेंनी थेट बाळू लोखंडेंना फोन केला. मँचेस्टरच्या मार्केटमध्ये एका मराठी माणसाचे नाव पाहून मी भारावून गेलो, म्हणून हा व्हिडीओ पोस्ट केला. व्हिडोओ पोस्ट केल्यानंतर राज्यमंत्री विश्वजित कदम, पानी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ यांनी माझ्याशी संपर्क केला, असे लेले यांनी फोनवरून सांगितले. लंडनहून भारतात परत आल्यानंतर सावळजला भेट घ्यायला येणार असल्याचे लेलेंनी सांगितले.