ईराणी गँगचा गुन्हेगार जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:27 IST2021-09-11T04:27:09+5:302021-09-11T04:27:09+5:30
तासगाव : निवृत्त तहसीलदाराला पोलीस असल्याची बतावणी करून ३६ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हातचलाखीने लांबविल्याप्रकरणी एक इराणी गुन्हेगाराच्या मुसक्या ...

ईराणी गँगचा गुन्हेगार जेरबंद
तासगाव : निवृत्त तहसीलदाराला पोलीस असल्याची बतावणी करून ३६ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हातचलाखीने लांबविल्याप्रकरणी एक इराणी गुन्हेगाराच्या मुसक्या तासगाव पोलिसांनी लोणी काळभोर पुणे येथून आवळल्या, अशी माहिती विभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी पत्रकारांना दिली. मुस्लिम नासीर इराणी (वय ३६ ) असे त्याचे नाव आहे.
निवृत्त तहसीलदार नारायण शंकर आदाटे (८३) हे सरस्वतीनगर वासुंबे येथे राहतात. २७ ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा दहा वाजता ते सैनिकी स्कूलच्या गेटसमोरून जात होते. यावेळी पाठीमागून मोटारसायकलवरून तिघेजण आले. नारायण यांना आम्ही पोलीस आहे. रात्री शीतल शिंदे यांच्या घरी चाकूने मारून चोरी झाली आहे. त्यांचे सोने-चांदी घेऊन गेले आहेत. आम्ही चौकशी करत आहे. तुमची चोरी होऊ नये म्हणून तुमच्याकडचे दागिने सोने रुमालात बांधून ठेवा, असे सांगितले. आदाटे यांनी सोने रुमालात बांधून ठेवले. दरम्यान, हातचलाखीने बोलण्यात गुंतवून त्यांची ३६ ग्रॅम वजनाची चेन त्यांनी लांबवली.
पोलिसांच्या तपासात मुस्लिम इराणी व त्याच्या दोन साथीदारांनी हे काम केल्याचे समोर आले. माहितीच्या आधारे पोलिसांनी लोणी काळभोर येथे धाड मारून त्याच्या मुसक्या आवळल्या व त्याच्याकडून १ लाख ४५ हजारांचा सोन्याचा गोफ जप्त केला.
या कारवाईत पोलीस हेडकॉन्स्टेबल अमित परीट, पोलीस नाईक सागर लवटे, सोमनाथ गुंडे, विलास मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल समीर आवळे, सतीश खोत, विनोद सकटे, दत्तात्रय जाधव, प्रशांत सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला.
चौकट:
३ महिन्यांत ११ गुन्हे उघडकीस
इराणी गुन्हेगार पकडणे आणि त्यांच्याकडून मुद्देमाल मिळवणे हे मुश्किल काम असते. मात्र, तासगाव पोलिसांनी मोठ्या शिताफीने व धाडसाने त्यांच्या मुसक्या आवळल्या. तीन महिन्यांत विविध प्रकारचे तब्बल ११ गुन्हे तासगाव पोलिसांनी उघडकीस आणले आहेत, अशी माहिती अश्विनी शेंडगे यांनी दिली.