इरळीत चार दिवस पिण्याचे पाणी नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:19 IST2021-06-03T04:19:20+5:302021-06-03T04:19:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिरढोण : कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळीमध्ये चार दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना दारोदार हिंडावे लागत आहे. जनावरे पाण्यासाठी ...

इरळीत चार दिवस पिण्याचे पाणी नाही!
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरढोण : कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळीमध्ये चार दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना दारोदार हिंडावे लागत आहे. जनावरे पाण्यासाठी हंबरडा फोडत आहेत. परंतु, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. सरपंच संजना आठवले यांनी अधिकाऱ्यांना भेटून गावाला पाणी द्या, विजेची सोय करा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.
इरळीमध्ये जलस्वराज्य योजनेशिवाय सार्वजनिक पाणी पुरवठा करणारी कोणतीही योजना नाही. गावामधील महावितरणचा डीपी जळाल्यामुळे चार दिवस पाणी मिळालेले नाही. महावितरणकडे नवीन डीपी देण्याची मागणी केली असता, पंधरा दिवसांनी देऊ, असे सांगितले जात आहे. त्यामुळे एवढे दिवस गावातील लोक पाण्यावाचून कसे राहणार, असा प्रश्न विचारून तत्काळ वीज जोडावी, अशी विनंती केली आहे. पिण्याच्या पाण्याचा विषय गंभीर असल्यामुळे आता गप्प बसणार नाही, असे बहुजन समाज पार्टीच्या सरपंच संजना आठवले यांनी सांगितले.
कोरोनाच्या काळामध्ये गावासाठी आंदोलन करावे लागले तरी चालेल, परंतु पाणी लवकरात लवकर मिळवून देणार, असा पवित्रा त्यांनी घेतला असून, तालुक्यातील सर्व कार्यालयांना निवेदन देऊन तातडीने पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे. यावेळी बापू लांडगे, कबीर लांडगे, भानुदास आठवले, विजय वाघमारे, सिद्राम गाडे, महिंद्र गाडे उपस्थित होते.