खुनाचा तपास उलट्या दिशेने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2015 00:38 IST2015-12-29T00:34:09+5:302015-12-29T00:38:42+5:30
इस्लामपुरातील प्रकार : मुख्य पाच सूत्रधार पडद्याआड

खुनाचा तपास उलट्या दिशेने
इस्लामपूर : येथील डॉक्टर प्रकाश कुलकर्णी आणि त्यांची पत्नी डॉ. अरुणा यांच्या खुनामागचे गूढ अद्याप कायम आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिलेली नाही. या गुन्ह्यातील आणखी पाचजणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पडद्याआड ठेवले आहे. या गुन्ह्यात वापरलेली हत्यारे, कपडे जप्त केले असले तरी, याला पंचनाम्यासाठी साक्षीदार मिळत नसल्याने गुन्ह्याचा तपास भरकटत चालला आहे.
खून प्रकरणात रुग्णालयातील महिला मदतनीस सीमा यादव, तिचा प्रियकर नीलेश दिवाणजी व त्याचा मित्र अर्जुन पवार या तिघांचा फक्त मारेकऱ्यांनी कुलकर्णी यांच्या घरातील माहिती घेण्यासाठी व घरात प्रवेश मिळवण्यासाठी वापर करून घेतल्याचे समोर येत आहे. कुलकर्णी यांचा खून नियोजनबध्द केला आहे. त्यामागचे खरे गूढ पोलिसांना उलगडले आहे. परंतु याला ठोस पुरावे नाहीत. त्यामुळे संशयितांची संख्या वाढत आहे. या गुन्ह्यात आणखी पाचजणांचा समावेश आहे. यामध्ये एकाकडून डॉ. कुलकर्णी यांच्याशी आर्थिक व्यवहार झाल्याचे कळते, तर हनुमाननगर, तिरंगा चौक, इंदिरा कॉलनी, रुग्णालय परिसर येथील प्रत्येकी एक अशा पाचजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ठोस पुरावे मिळाल्यानंतरच हे चेहरे समोर आणले जाणार असल्याचे पोलीस सांगत आहेत.
ताब्यातील संशयितांची चौकशी केली असता, वेगवेगळी मते येत असल्याने तपास तिसरीकडेच भरकटत चालला आहे. (प्रतिनिधी)
गुन्ह्यातील वस्तू जप्त
गुन्ह्यात वापरलेल्या जवळजवळ १५ वस्तू जप्त केल्या असून, त्याचा पंचनामा करण्यासाठी साक्षीदार म्हणून काहींच्या साक्षी घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु यश आलेले नाही.