अंतर्मुख करणारे ‘अग्निदिव्य’--
By Admin | Updated: November 27, 2015 00:42 IST2015-11-26T23:08:38+5:302015-11-27T00:42:57+5:30
राज्य नाट्य स्पर्धा

अंतर्मुख करणारे ‘अग्निदिव्य’--
श्री हनुमान तरुण मंडळ (काळम्मावाडी) या संस्थेने गेल्या पंधरा-वीस वर्षांत सुनील माने, प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल केली आहे. आधुनिक नाट्य तंत्रापासून ‘कोसो दूर’ असलेल्या या मंडळींनी कमतरतेवर मात करत कोल्हापूर केंद्रावर बघता-बघता आपल्या संस्थेचा दबदबा निर्माण करून प्रस्थापितांना हादरे दिले आहेत. संस्थेच्या लौकिकाला योग्य असे नाटक ‘अग्निदिव्य’ करायचा प्रयत्न यावर्षी प्रकाश पाटील यांनी केला अन् तो काही त्रुटी वगळता यशस्वीही झाला आहे.
समाजप्रबोधनासाठी रंगकर्मी सामाजिक आशय असलेली नाटके सातत्याने करताना आढळतात. ‘अग्निदिव्य’ नाटक हा त्यापैकीच एक प्रयत्न. भव्य नेपथ्यापेक्षा एक सशक्त, अंतर्मुख करायला लागणारा विचार महत्त्वाचा आहे, जो ‘अग्निदिव्य’ नाटकात आहे. उपलब्ध साहित्यांतून राजर्षी शाहू महाराजांचा नवा राजवाडा उभारायचा प्रयत्न झाला खरा; पण कलाकारांच्या हालचालींवर बंधने आली. खेरीज दुसरे दृश्य मांडताना आटापिटा करावा लागला नसता. एवढेही करून टिळकांच्या गायकवाड वाड्याच्या मागे अर्धा-मुर्धा झाकला गेलेला शाहू महाराजांचा वाडा प्रेक्षकांनी विनातक्रार स्वीकारला. सूचक नेपथ्यातून मोकळेपणानं आणि अंधार-उजेडाचे खेळ न करता मांडलेले नाटक पण प्रेक्षकांनी नक्कीच स्वीकारले असते. या नाटकातील शाहू महाराज आणि टिळक या महत्त्वाच्या व्यक्तिरेखांना मोकळेपणानं वावरायला मुभा मिळाली असती. अशा नाटकांत सहजीशक्य असेल तरच नाटकातील वेळ, काळानुरूप वेशभूषेतील बदल स्वीकारावे लागतात. अन्यथा त्याची काहीच आवश्यकता नसते; शिवाय स्वीकारलेच तर सर्व पात्रांचा विचार व्हावा लागतो. एक पात्र नाटकभर एकाच पोशाखात आणि दुसरे वारंवार पोशाख बदलते, ही गोष्ट प्रेक्षकांना अतर्क्य वाटते. या नाटकाची प्रकाश योजना ठीकठाक होती; पण या सगळ्या झाल्या तांत्रिक बाजू आणि त्याही या प्रयोगातील. त्यामुळे बदल करण्यास किंवा सुधारणा करण्यास नक्कीच वाव आहे. प्रकाश पाटील, सुनील माने सर्जक रंगकर्मी आहेत. त्यांनी याचा विचार केलाच असेल.
कोल्हापुरातच अनधिकृत मंदिर, मशीद, चर्च यांची संख्या फोफावली असून नवपुरोहितांची संख्या पण फोफावली आहे. ट्रेनिंग आणि मार्केटिंगची ‘प्राईम लोकेशन्स’ म्हणून धार्मिक स्थळांचा आणि त्यांच्या व्यापाऱ्यांचा टीआरपी गगनाला भिडलेला असताना राजर्षी शाहू महाराजांच्या वेदोक्त प्रकरणाबद्दल कुणाला आस्था वाटणार? शाहू, फुले, आंबेडकर यांची नावे घेऊनच जर कर्मठ सनातनीसुद्धा आपलं दुकान लावतोय; तिथे इतरांची काय कथा? याउलट विचार मांडणारे, समाजाला दिशा देणारे, गोळ्या झेलून हकनाक मरताहेत म्हणजेच शाहू महाराजांचे वेदोक्त प्रकरण आणि पुरोहित मंडळींचा त्या प्रकरणातील लांच्छनास्पद दुराग्रह ‘जैसे थे’च आहे. छत्रपती शाहू व टिळक यांच्या संबंधातील द्वंद्व हे नाटक ताकदीने मांडते व काळाच्या आणि जातीच्या चौकटीत मोठी माणसेही काहीवेळा किती संकुचित वागतात याचाही दाखला देते. हे नाटक प्रेक्षकांना नक्कीच अंतर्मुख करते.
प्रकाश पाटील यांनी आपल्या टीमला घेऊन आपल्याकडील शंभर टक्के देण्याचा केलेला यशस्वी प्रयत्न नक्कीच अभिनंदनाला पात्र आहे. ‘विशिष्ट श्रेष्ठमंडळींनीच असे प्रबोधननाट्य सादर करावे,’ या गैसमजालाही या नाटकाच्या प्रयोगाने खोडून काढले आहे. सर्वच कलाकारांनी आपापल्या व्यक्तिरेखांना समर्थ साथ दिल्यामुळे प्रयोग प्रेक्षणीय आणि श्रवणीय झाला. एखादे पात्र अडखळले तर तो अपघात समजण्याचा रसिकपणा आॅडिटोरिअम दाखवत होते आणि प्रयोग एकटक पाहत होते याहून आणखी काय हवे?
प्रसन्न जी. कुलकर्णी