वानलेसवाडीतील खुले भूखंड हडपण्याचा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:30 IST2021-08-13T04:30:56+5:302021-08-13T04:30:56+5:30
सांगली : वानलेसवाडी येथील एका गृहनिर्माण सोसायटीतील अंदाजे ३५ गुंठ्यांचे दोन भूखंड हडपण्याचा डाव आखण्यात आला आहे. या भूखंडाला ...

वानलेसवाडीतील खुले भूखंड हडपण्याचा डाव
सांगली : वानलेसवाडी येथील एका गृहनिर्माण सोसायटीतील अंदाजे ३५ गुंठ्यांचे दोन भूखंड हडपण्याचा डाव आखण्यात आला आहे. या भूखंडाला कुंपण घालण्यात आले आहे. महापालिकेने तातडीने पंचनामा करून हे दोन्ही भूखंड ताब्यात घ्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक विष्णू माने यांनी गुरुवारी आयुक्तांकडे केली.
याबाबत त्यांनी निवेदनही दिले आहे. माने म्हणाले की, वानलेसवाडी येथील एका गृहनिर्माण सोसायटीत मंजूर रेखाकंनातील दोन भूखंड आहेत. मूळ मालकाने विनामोबदला दोन्ही भूखंडाची कब्जेपट्टी महापालिकेला देणे बंधनकारक आहे, पण आजअखेर मालकाने महापालिकेला ताबा दिलेला नाही. उलट या भूखंडावर तारेचे कंपाऊंड व लोखंडी गेट लावून तो हडपण्याचा डाव आखला आहे. हे दोन्ही भूखंड अंदाजे चार कोटी रुपये किमतीचे आहेत. भूखंडाचा मालक हा गृहनिर्माण संस्थेचा अध्यक्षही आहे. या भूखंडात त्याने बेकायदेशीरीत्या कूपनलिकाही खोदली आहे. त्याने वीज कनेक्शनसाठी महावितरणकडे अर्ज केला होता, पण नागरिकांच्या तक्रारीमुळे त्याला वीज कनेक्शन देण्यात आलेले नाही.
याबाबत सोसायटीतील नागरिकांनी महापालिकेला वारंवार ताबा घेण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. दोन्ही भूखंडाला कंपाऊंड घातल्याने सोसायटीतील वयोवृद्ध नागरिकांना फिरण्यासाठी हक्काची जागा नाही. राष्ट्रीय सण साजरे करता येत नाहीत. त्यामुळे महापालिकेने तातडीने हे भूखंड ताब्यात घेऊन त्याच्या सातबारा उताऱ्यावर नाव लावावे, अशी मागणी माने यांनी केली आहे.