व्यापारी संकुलाचा डाव फसला, आरोग्य तपासणी लॅब उभारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:30 IST2021-09-06T04:30:11+5:302021-09-06T04:30:11+5:30
शीतल पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील त्रिकोणी बागेजवळील मोक्याच्या जागेवर व्यापारी संकुल उभारण्यासाठी गेल्या वर्षभरापासून काही नगरसेवकांची ...

व्यापारी संकुलाचा डाव फसला, आरोग्य तपासणी लॅब उभारली
शीतल पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील त्रिकोणी बागेजवळील मोक्याच्या जागेवर व्यापारी संकुल उभारण्यासाठी गेल्या वर्षभरापासून काही नगरसेवकांची धडपड सुरू होती. हा डाव आयुक्त नितीन कापडणीस यांनी हाणून पाडला. या जागेत आता आरोग्य तपासणी लॅब, एक्स रे आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत. येत्या महिन्याभरात ही लॅब कार्यान्वित होईल.
त्रिकोणी बागेजवळ महापालिकेचे बालमंदिर होते. गेल्या काही वर्षांपासून हे बालमंदिर बंद आहे. तिथे दोन ते तीन खोल्यांचे पक्के बांधकाम करण्यात आले होते. बालमंदिरसमोर खोक्याही बसविण्यात आली आहेत. महापालिकेतील काही पदाधिकारी व नगरसेवकांनी या बालमंदिराच्या जागेवर व्यापारी संकुल उभारण्यासाठी प्रयत्न चालविले होते तशी चर्चाही सुरू झाली होती. माधवनगर येथील जकात नाक्याच्या जागेपाठोपाठ याठिकाणीही संकुल असावे, यासाठी जोरदार फिल्डिंगही लावली होती. पण हा प्रयत्न आयुक्त नितीन कापडणीस यांच्यामुळे फसला.
कोरोनाच्या काळात खासगी लॅबचालकांनी नागरिकांकडून विविध चाचण्यांसाठी भरमसाठ बिलाची आकारणी केली. काही खासगी लॅबला आयुक्तांनी स्वत: भेट देऊन पाहणीही केली होती. शहरातील गोरगरिबांना खासगी लॅबचे दर परवडणारे नसल्याचे जाणीव त्यांना झाली होती. त्यामुळे त्यांनी महालॅबशी संलग्न महापालिकेची लॅब उभारण्याचा निर्णय घेतला. बालमंदिरची जागा व्यापारी संकुलाऐवजी लॅबसाठी वापरण्यात आणण्याची योजना आखली. बालमंदिरला भेट दिली. तिथे असुविधांच अधिक होत्या. आधीच कित्येक वर्षापासून बालमंदिरची इमारत बंद असल्याने आजूबाजूला झाडेझुडपे, गवत उगविले होते. खोल्यामधील फरशीही उचकली होती. भिंतींचा रंगही उडाला होता. आयुक्तांनी या इमारतीच्या दुरूस्तीचे आदेश आरोग्य विभागाला दिले.
त्यानुसार आता या इमारतीचे रूपच बदलून गेले आहे. लवकरच या इमारतीत लॅब सुरू होणार आहे. रक्ताच्या चाचणीपासून ते विविध प्रकारच्या २४ चाचण्या अगदी अल्प दरात केल्या जाणार आहे. महापालिकेची ही प्रयोगशाळा महालॅबशी संलग्न असेल. शिवाय एक्स रेसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. बालमंदिरचे अस्तित्व कायम ठेवण्यात आले आहे. एका बाजूला मुलांसाठी बालवाडी तर दुसऱ्या बाजूला प्रयोगशाळा असे नियोजन आहे. आयुक्तांच्या या निर्णयामुळे नगरसेवकांचे व्यापारी संकुलाचे स्वप्न भंगले आहे.
चौकट
बालमंदिरचे रूपच बदलले
तत्कालीन सांगली नगरपालिकेच्या काळात त्रिकोणी बागेजवळ बालमंदिर उभारण्यात आले. मुलांसाठी दोन खोल्यांची इमारत उभारली गेली. पण काही वर्षांपासून हे बालमंदिर बंद आहे. त्यामुळे तिथे अस्वच्छता, पडझड झाली होती. आता मात्र संपूर्ण परिसराचे रूपच बदलले आहे. संपूर्ण परिसराला तारेचे कुंपण घालण्यात आले आहे. बाहेरील बाजूला पेव्हिंग ब्लाॅक बसविले आहे. छोटे उद्यानही तयार केले जात आहे. इमारतीची रंगरंगोटी करण्यात आली असून अगदी खिडक्या-दारापासून फरशीपर्यंत साऱ्या गोष्टी नवीन झाल्या आहेत.