अशोक पाटीलइस्लामपूर : इस्लामपूर-शिराळा मतदारसंघातील अंतर्गत गटबाजीमुळे राजकीय हवा चांगलीच तापणार आहे. जिथे पक्ष, तिथे नेता अशी अवस्था झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गटनेतेच बेरजेच्या राजकारणासाठी स्वत:च्या अस्तित्वाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळेच कार्यकर्त्यांचा भाव चांगलाच वधारणार आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक चुरशीच्या होण्याची शक्यता आहे.इस्लामपूर मतदारसंघात आमदार जयंत पाटील यांचे आजही वर्चस्व आहे. झालेल्या विधानसभा निवडणुकीत मताधिक्य घटले असले तरी सहकारी चळवळीत त्यांची ताकद मोठी आहे. त्यामुळेच त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांत स्थानिक पातळीवर अंतर्गत गटबाजीच्या राजकारणाचा खेळ नेहमीच चव्हाट्यावर आलेला आहे. याचाच फायदा विरोधकांना होत चालला आहे. सध्या इस्लामपूर मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाची एन्ट्री झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाची माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील, तालुकाध्यक्ष केदार पाटील यांचा नवीनच गट तयार झाला आहे.विक्रम पाटील यांनी पक्षनिष्ठा सांभाळून भाजप पक्षाला तारले आहे. इस्लामपूर मतदारसंघात राहुल महाडिक यांनीही भाजप पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे भाजपमध्येही वेगवेगळे गट आहेत. तर शिंदेसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार आणि हुतात्माचे गौरव नायकवडी यांनीही शिंदेसेनेला ताकद दिली आहे. एकंदरीत इस्लामपूर मतदारसंघात पक्षीय गटबाजीला उधाण आले आहे.शिराळा मतदारसंघात पारंपरिक असे तीन राजकीय गट होते. यामध्ये माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख आणि मानसिंगराव नाईक यांचा समावेश होता तर आता शिराळा मतदारसंघात नव्यानेच महाडिक गटाचा शिरकाव झाला. परंतु अलीकडेच शिवाजीराव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने अजित पवार गटाला नाईक यांच्या रूपाने ऊर्जा मिळाली आहे. त्यामुळे दोन्ही मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलत आहेत.
राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता आपण वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. उद्योगसमूह आणि सहकार क्षेत्राला ताकद देऊन शिराळा मतदारसंघात संपर्क वाढवण्यासाठी सातत्याने आपले प्रयत्न सुरू आहेत. - मानसिंगराव नाईक, माजी आमदार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार