फोटो ओळ : देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या प्रचाराप्रसंगी डाॅ. सुरेश भोसले यांनी भाषण केले. यावेळी सोबत पृथ्वीराज देशमुख, अतुल भोसले उपस्थित होते.
देवराष्ट्रे : घाटमाथ्यावरील सभासद हा स्वाभिमानी आहे. डॉ. इंद्रजित मोहिते यांची सत्ता कारखान्यावर असताना त्यांनी एक रुपया टन ऊस बिल काढले, तर सभासदांना रांगेत उभा करून १४.४० रुपये किलो साखर देऊन सभासदांचा अपमान केला; पण आम्ही घरपोच साखर देणार आहोत. एफआरपी देण्याबाबात अडचणी असल्यातरी सभासदांना चांगला ऊस दर देणार असल्याचे प्रतिपादन डॉ. सुरेश भोसले यांनी केले.
देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे सहकार पॅनलच्या प्रचाराप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अतुल भोसले, पृथ्वीराज देशमुख प्रमुख उपस्थित होते.
सुरेश भोसले म्हणाले, कृष्णा कारखान्याची निर्मिती अनेक अडचणींतून झाली. त्याचे अनेक साक्षीदार आहेत. भविष्यात कारखाना क्रमांक एकवर नेऊ. पाणी योजना सक्षम करू. विरोधक साखर गट ऑफिसवर देऊ असे म्हणत आहेत, तर आम्ही ती घरपोच देऊ. आम्ही जे बोलतो तेच करतो. भविष्यात एकरी उसाचे उत्पादन वाढावे यासाठी कृषी परिषद या संस्थेची स्थापना करू, असेही सांगितले.
अतुल भोसले पुढे म्हणाले की, आमच्या पॅनलच्या यशात घाटमाथ्यावरील सभासदांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. जोपर्यंत पृथ्वीराज देशमुख व संग्राम देशमुख यांचे कार्यकर्ते आमच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, तोपर्यंत आम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहे.
यावेळी उमेदवार बाबासाहेब शिंदे, शेतकरी संघटनेचे नेते विलास कदम, केशव पाटील, कृष्णत मोकळे, अशोक पाटील, शिवाजी पाटील, महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील, सभापती मंगलताई क्षीरसागर, जिल्हा परिषद सदस्या शांताताई कनुंजे, शिवराज जगताप, ब्रीजराज मोहिते उपस्थित होते. भारत पाटील यांनी आभार मानले.