सहदेव खोतपुनवत : सध्या ग्रामीण भागात गावोगावच्या यात्रा सुरू आहेत. मात्र, या यात्रेतील धार्मिकता, पारंपरिकता नष्ट होऊ लागली असून, तरुणाई डॉल्बी उत्सवाकडे वळू लागली आहे. त्यामुळे पालखी सोहळे ओस पडू लागल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहावयास मिळत आहे. डॉल्बीच्या वाढत्या प्रस्थमुळे अनेक गावांत मारामारी, दंगे अशा प्रकारांना ऊत आला आहे. सर्वसामान्य लोकांतून याबाबत तिखट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.ग्रामीण भागात सध्या अनेक गावच्या यात्रा सुरू आहेत. या यात्रांमध्ये दैवतांची पूजाअर्चा, पालखी सोहळा, सासनकाठी मिरवणूक, पारंपरिक वाद्यांचा गजर, कुस्ती मैदान अशा अनेक बाबींचा समावेश होतो. परंतु, अलीकडच्या काळात ग्रामीण भागातील यात्रांचे स्वरूप बदलू लागले आहे. सासनकाठी नाचवणे, पालखीची मिरवणूक आदी कार्यक्रमांमध्ये असणारी पारंपरिकता नष्ट होऊ लागली आहे. याऐवजी यात्रा म्हणजे केवळ नाचगाण्याचा उत्सव होऊ लागला आहे. अनेक गावांतील तरुण मंडळी यात्रेनिमित्त डॉल्बी गावात आणू लागली असून, डॉल्बी मोठमोठ्या आवाजात वाजवले जात आहे. एकेका गावात अनेक डॉल्बी आणून स्पर्धा लावल्या जात आहेत. यामुळे आबालवृद्धांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संपूर्ण युवावर्ग डॉल्बीकडे आकर्षित झाल्यामुळे गावातील इतर धार्मिक कार्यक्रमांना लोकांची अत्यल्प उपस्थिती पहावयास मिळत आहे. यात्रा म्हणजे केवळ डॉल्बी उत्सव झाला आहे. यात्रेनिमित्त गावागावात पोस्टरबाजीला उधाण आले आहे.यात्रेतील डॉल्बीमुळे पारंपरिक वाद्ये हद्दपार होऊ लागली आहेत. कुस्त्यांच्या मैदानातही मोठे साऊंड लावले जात आहेत. अनेक ठिकाणी डॉल्बी आवाजामुळे युवकांना कानाचे विकार होऊ लागले आहेत.
पोलिसांनी अंकुश ठेवावायात्रेच्या निमित्ताने गावागावात मोठ्याने डॉल्बी वाजवणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी. हुल्लडबाजी करणाऱ्यांना चाप बसवावा, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
गावांचा असाही आदर्शयात्रांच्या काळात गावात डॉल्बी बंदी करणारी गावेही आहेत. यात्रेतील धार्मिकता टिकविण्याचा प्रयत्न काही ठिकाणी होत आहे. मोजक्या गावात पारंपरिक वाद्ये आणून मिरवणुका काढल्या जात आहेत. अशा गावांचा इतरांनी आदर्श घेण्याची गरज निर्माण झाली आहे.