शेतकऱ्यांना पैसे येण्याऐवजी आले फक्त ‘मोदी मेसेज’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:24 IST2021-05-22T04:24:37+5:302021-05-22T04:24:37+5:30
शिवाजी पाटील कोकरुड : पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे दोन हजार रुपये येण्याऐवजी काही शेतकऱ्यांना केवळ पैसे दिल्याचे पंतप्रधान नरेंद्र ...

शेतकऱ्यांना पैसे येण्याऐवजी आले फक्त ‘मोदी मेसेज’!
शिवाजी पाटील
कोकरुड : पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे दोन हजार रुपये येण्याऐवजी काही शेतकऱ्यांना केवळ पैसे दिल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मेसेज आले आहेत. बँकेत पैसेच जमा न झाल्याच्या तक्रारी असून, अनेकांचा बँक कर्मचाऱ्यांशीच वाद सुरू आहे.
अडीच वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना चार महिन्याला दोन हजार असे वार्षिक सहा हजार रुपये जाहीर केले. त्याप्रमाणे ज्या राज्यांनी ही योजना लागू केली, तेथील शेतकऱ्यांना पैसे मिळू लागले. आठ महिन्यांपूर्वी ज्यांच्याकडे चारचाकी वाहन, व्यवसाय आहे, जे प्राप्तीकर भरत आहेत आणि जे शासकीय नोकरीला आहेत, अशा शेतकऱ्यांचे पुढील हप्ते बंद करुन आधी दिलेले पैसे महसूल विभागामार्फत वसूल करण्यात आले.
आता आठ दिवसांपासून पुन्हा या योजनेचा एप्रिल ते जुलैअखेरचा दोन हजारांचा आठवा हप्ता देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. त्याप्रमाणे चार दिवसात अनेकांच्या खात्यात पैसे जमाही झाले आहेत. मात्र, अनेक पात्र लाभार्थींना बँकेकडून पैसे जमा झाल्याचे मेसेज न आल्याने जवळच्या शाखेत जाऊन चौकशी केली असता, पैसे आले नसल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यांना यापूर्वी देण्यात आले आहेत, त्यांनाही यावेळी पैसे आलेले नाहीत. मात्र, त्यांना ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘पीएम किसान’ योजनेेंतर्गत एप्रिल २०२१ ते जुलै २०२१ या अवधीसाठी असलेला दोन हजार रुपयांचा हप्ता आपल्या खात्यात जमा केला गेला असून, या महामारीच्या काळात हा आपल्याला विशेष प्रकारे उपयोगी पडेल. मी आपल्याला व आपल्या कुटुंबाला चांगले आरोग्य लाभावे, अशी प्रार्थना करतो’ असे मेसेज आले आहेत.
चौकट
मोदींना जाऊन विचारा!
मेसेज येऊन आठ दिवस झाले तरी पैसे आले नसल्याने बऱ्याचजणांनी संबंधित बँक अधिकाऱ्यांकडे चौकशी केली. त्यावेळी पैसे जमा नसल्याचे सांगण्यात आले. यावरून शेतकरी आणि बँक अधिकारी यांच्यात वादाच्या घटनाही घडल्या आहेत. पैसे का आले नाहीत, म्हणून विचारले असता, ‘मोदींना जाऊन विचारा’, असे सांगण्यात येत आहे.