कदमांवर टीका करण्याऐवजी जत तालुक्याचे प्रश्न सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2015 22:50 IST2015-10-01T22:50:14+5:302015-10-01T22:50:14+5:30
काँग्रेसचा जगतापांना टोला : पाणी प्रश्न मार्गी लावा

कदमांवर टीका करण्याऐवजी जत तालुक्याचे प्रश्न सोडवा
जत : आ. विलासराव जगताप यांनी भारती विद्यापीठाची नाहक बदनामी करण्यापेक्षा तालुक्यातील विकासकामांवर लक्ष केंद्रित करून पाण्याचा प्रश्न निकालात काढावा, अशी टीका जत तालुका कॉँग्रेसचे अध्यक्ष पी. एम. पाटील यांनी केली आहे.
ते म्हणाले की, जगताप यांनी तालुक्यातील चारा, पाणी, वीज दाबनियमन, विभाजन या प्रमुख महत्त्वाच्या प्रश्नांवर विधानसभेत कितीवेळा आवाज उठविला आहे किंवा संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडे कितीवेळा कामाचा पाठपुरावा केला आहे, हे त्यांनी जाहीर करावे. आ. पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठाच्या माध्यमातून रुग्ण सुविधा, विविध शैक्षणिक सुविधा माफक दरात उपलब्ध केल्या आहेत. आ. विलासराव जगताप यांची लोकप्रियता कमी झाली आहे. त्यामुळे आ. पतंगराव कदम यांच्यावर खोटे आरोप करून ते प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. भारती विद्यापीठ जमीन खरेदी प्रकरणाची प्रशासकीय पातळीवर चौकशी करावी. परंतु नाहक बदनामी करू नये, असेही म्हटले आहे.
बिरनाळ, शेगाव साठवण तलाव पाणी पूजन व विविध रस्ते आणि इतर कामे आघाडी शासनाच्या कार्यकाळात मंजूर होऊन त्यासाठी त्यावेळी आर्थिक तरतूद करण्यात आली होती. परंतु या कामाचे फुकटचे श्रेय आ. विलासराव जगताप घेत आहेत, असा आरोप प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे. जत पंचायत समितीवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे का, राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची सत्ता आहे, ते समजून येत नाही. जर तेथे भाजपची सत्ता असेल, तर त्यांनी तसे जाहीर करावे. स्वार्थासाठी पक्षाचा वापर करून जगताप यांनी आमदारकी मिळविली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची पक्षनिष्ठा किती आहे, ते तपासून पहावे, असे आवाहनही केले आहे.
यावेळी बाजार समिती सभापती संतोष पाटील, जिल्हा बॅँकेचे संचालक विक्रम सावंत, पंचायत समिती सदस्य पिराप्पा माळी, मल्लेश कत्ती, नगरसेवक सुजय शिंदे, मोहन कुलकर्णी व रवींद्र सावंत, बाबासाहेब कोडग, आप्पाराया बिराजदार आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
खोट्या आश्वासनांबद्दल जगतापांनी खुलासा करावा
उमदी येथील पाणी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना आमदारांनी खोटे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक केली आहे. यासंदर्भात त्यांनी खुलासा करावा
ग्रामपंचायत, जिल्हा बॅँक, बाजार समिती निवडणूक याठिकाणी आ. जगताप यांना हार पत्करावी लागल्यामुळे ते बेताल आरोप करीत असल्याचा आरोप पाटील यांनी केला.