कृष्णेच्या दूषित पाण्याची तपासणी
By Admin | Updated: November 1, 2015 00:02 IST2015-10-31T23:41:25+5:302015-11-01T00:02:27+5:30
महापालिकेला नोटीस देणार : ‘प्रदूषण’ अधिकाऱ्यांचा इशारा

कृष्णेच्या दूषित पाण्याची तपासणी
सांगली : शेरीनाल्याचे दुर्गंधीयुक्त पाणी नदीत मिसळत असल्याने नदीतील मासेही मृत होत आहेत. याची गंभीर दखल प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली असून, याठिकाणच्या पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी ते चिपळूणला पाठविण्यात आले आहेत. नदीत मिसळणारे सांडपाणी तातडीने थांबविण्याबाबत महापालिकेला नोटीस बजावण्यात येणार असल्याचा इशाराही मंडळाने दिला आहे.
उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी लिंबाजी भड यांनी सांगितले की, तातडीने आम्ही नदीपात्रातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. नदी प्रदूषणप्रश्नी महापालिकेवर यापूर्वीच खटला दाखल केला आहे. तरीही या घटनेची नोंद घेऊन आम्ही तातडीने सांडपाणी रोखण्याबाबत महापालिकेला नोटीस बजावणार आहोत. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नदीतील प्रदूषणाबाबत वारंवार नोटिसा बजावल्या जात असल्या तरी महापालिकेकडून त्याची दखल घेतली जात नाही. सध्या नदीत मिसळणाऱ्या शेरीनाल्याच्या पाण्यामुळे दुर्गंधीत आणि नदीच्या प्रदूषणात वाढ होत असल्याने आता बंधाऱ्याच्या पलीकडे सांडपाणी सोडण्यात येत आहे. मात्र, नदीतील प्रदूषणात वाढच होत आहे. शेरीनाल्याचे पाणी सरळ नदीत मिसळत असतानाही त्यावर उपाययोजना होत नसल्याने नदीपात्रातील पाणी गढूळ आणि दुर्गंधीयुक्त बनत चालले आहे. (प्रतिनिधी)
मिरजेतही मासे मृत
मिरज : मिरजेत कृष्णा घाटावर नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झाल्याने नदीतील माश्यांचा मृत्यू झाला आहे. शहरात ुदूषित पाण्याचा पुरवठा सुरू असल्याने नागरिक त्रस्त आहेत मिरजेत कृष्णाघाटावर नदीची पाणी पातळी खालावली असून, पाणी दूषित झाल्याने जलतरांचा मृत्यू होत आहे. हिरव्या रंगाचा दुर्गंधीयुक्त पाण्यात दोन दिवस मोठ्या प्रमाणात माश्यांचा मृत्यू झाला. नदीकाठी मृत मासे पडले असून, महापालिका आरोग्य व पाणी पुरवठा विभागाने याची दखल घेऊन स्वच्छता, साफसफाईच्या उपाययोजना राबविलेल्या नाहीत. सांगलीत नदीपात्रात मोठ्या प्रमाणात दूषित पाणी सोड्यात येत आहे. यामुळे मिरजेतही दूषित पाणीपुरवठा सुरू आहे. शहरातील विविध भागात दूषित पाणीपुरवठा होऊन नागरिकांना जुलाब व साथीच्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे.