जिल्हा उद्योग केंद्राकडून १२५ कारखान्यांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:26 IST2021-04-25T04:26:30+5:302021-04-25T04:26:30+5:30
कुपवाड : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा उद्योग केंद्रामार्फत जिल्ह्यातील विविध औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. तपासणीसाठी ...

जिल्हा उद्योग केंद्राकडून १२५ कारखान्यांची तपासणी
कुपवाड : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा उद्योग केंद्रामार्फत जिल्ह्यातील विविध औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. तपासणीसाठी जिल्हा उद्योग केंद्राककडून सहा भरारी पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. या पथकाकडून आतापर्यंत १२५ हून अधिक कारखान्यांची तपासणी करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शासनाने कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करून विविध औद्योगिक वसाहतीमधील कारखाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये अत्यावश्यक, निर्यातक्षम आणि ज्या उद्योगांनी कामगारांची कारखाना आवारात राहण्याची व्यवस्था केली आहे, अशा उद्योगांनाच कारखाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध औद्योगिक वसाहतीमध्ये कार्यरत असलेल्या उद्योगांची तपासणी गेल्या आठवड्यापासून सुरू झाली आहे. ही तपासणी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नितीन कोळेकर व व्यवस्थापिका विद्या कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखालील सहा भरारी पथकाच्या माध्यमातून सुरू आहे.
याबरोबरच उद्योग विभागाने जिल्ह्यातील विविध औद्योगिक वसहतीमधील उद्योजकांची बैठक घेऊन कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
याबाबत विद्या कुलकर्णी म्हणाल्या की, जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार विविध औद्योगिक वसाहतीमध्ये कारखान्यांना भेटी देऊन कोरोनाबाबत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होते का नाही? याची तपासणी केली जात आहे. ही तपासणी सध्या प्राथमिक स्वरूपात सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातील तपासणी मोहिमेत नियमांकडे कानाडोळा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.