Insist on tax exemption of traders: Aditya Thackeray | व्यापाऱ्यांच्या कर सवलतीबद्दल आग्रह धरू : आदित्य ठाकरे
व्यापाऱ्यांच्या कर सवलतीबद्दल आग्रह धरू : आदित्य ठाकरे

ठळक मुद्देव्यापाऱ्यांच्या कर सवलतीबद्दल आग्रह धरू : आदित्य ठाकरे बालाजी चौकात विविध व्यापाऱ्यांशी केली चर्चा

सांगली : महापुराने उद्ध्वस्त केलेल्या सांगलीतील बाजारपेठांमधील व्यापाऱ्यांना जीएसटी, विद्युत बिल, घरपट्टी व अन्य करातील सवलतींबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून यासाठी आग्रह धरू, असे आश्वासन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगलीतील व्यापाऱ्यांना दिले.

येथील बालाजी चौकात त्यांनी विविध व्यापाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार धैर्यशील माने, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आ. राजेश क्षीरसागर, संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले की, सांगलीतील व्यापारी पेठांत झालेली हानी खूप मोठी आहे. त्यांचे नुकसान भरून न निघणारे आहे. आम्ही व्यापाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. शेतकरी, सामान्य नागरिकांप्रमाणेच व्यापाऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, ही आमची आग्रही मागणी आहे.

याठिकाणचे व्यापारी पुन्हा संकटातून सावरतील इतपत तरी मदत आम्ही देऊ. त्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी लवकरच चर्चा करणार आहोत. येथील व्यापाऱ्यांनी जीएसटी, आयकर, घरपट्टी व अन्य करांबाबत सवलतीची मागणी केली आहे. याबाबत जीएसटी आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्याबाबतचे एक पत्र जीएसटी विभागास पाठविण्यात येईल. मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या  बैठकीत आम्ही पूरग्रस्त व्यापाऱ्यांच्या करसवलतीबाबत आग्रह धरू. सवलतींबरोबरच व्यापाऱ्यांना जादा भरपाई मिळावी, अशी मागणीही करण्यात येईल. व्यापारी पेठा या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यावर शहराचे अर्थचक्र अवलंबून असते. त्यामुळे त्यांना पाठबळ देण्याची गरज आहे.

एकता व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी ठाकरे यांना निवेदन दिले. यावेळी शहा म्हणाले की, सांगलीच्या सर्व मुख्य बाजारपेठा पाण्यात होत्या. अब्जावधीचे नुकसान या पेठांमध्ये झाले आहे. सर्व खराब माल कचऱ्यांत फेकावा लागला. शासनाने जाहीर केलेली ५0 हजार रुपयांची मदत स्वच्छतेच्या कामीही येणार नाही. त्यामुळे ही मदत अत्यंत तोकडी आहे.

व्यापाऱ्यांना किमान या संकटातून योग्य पद्धतीने उभारता येईल, अशी मदत शासनाने द्यावी. शेतकरी, नागरिकांसाठी त्यांनी जाहीर केलेली मदत स्वागतार्ह आहे. आम्ही त्याबाबत समाधानी आहोत. मात्र व्यापाऱ्यांबाबत अद्याप समाधानकारक निर्णय झालेले नाहीत.

यावेळी पापा सारडा, शीतल पाटील आदी व्यापारी, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, संजय विभुते, जिल्हा संघटक दिगंबर जाधव, शेखर माने, शंभोराज काटकर, मयूर घोडके, गजानन मोरे, गणेश लोखंडे आदी उपस्थित होते.

Web Title: Insist on tax exemption of traders: Aditya Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.