रोजगार हमीच्या कामावरून गदारोळ
By Admin | Updated: November 17, 2014 23:22 IST2014-11-17T23:06:55+5:302014-11-17T23:22:06+5:30
मिरज पं. स. बैठक : दिलीप बुरसे यांचा कारवाईचा इशारा

रोजगार हमीच्या कामावरून गदारोळ
मिरज : मिरज तालुक्यात रोजगार हमी योजनेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या जनावरांचा गोठा बांधकाम व विहीर खुदाईसाठी अडवणुकीमुळे कामे रखडल्याच्या तक्रारीमुळे सभापती व सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांपासून कर्मचारी व ग्रामसेवकांची झाडाझडती घेतली. १ डिसेंबरपर्यंत कामे मार्गी लागून लाभार्थ्यांना कामाचे हप्ते न दिल्यास दोषींवर कडक कारवाई करण्याचा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला. बैठकीत एकमेकांकडे बोटे दाखवून गटविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारी झटकण्याच्या केलेल्या प्रयत्नाचाही समाचार घेण्यात आला.
मिरज तालुक्यात रोजगार हमी योजनेंतर्गत जनावरांचा गोठा बांधकाम, विहीर खुदाईच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. लाभार्थ्यांनी उसनवार पैसे घेऊन ही कामे सुरु केली आहेत. बऱ्याच लाभार्थ्यांनी गोठा बांधकाम व विहीर खुदाईची कामे सुरु केली असताना झालेल्या कामांचा एकही हप्ता मिळाला नाही. हेलपाटे मारुनही अधिकारी व कर्मचारी दाद देत नसल्याने वैतागलेल्या लाभार्थ्यांनी सभापती दिलीप बुरसे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.
तक्रारींची दखल घेऊन सभापती दिलीप बुरसे, सदस्य सतीश निळकंठ, शंकर पाटील, बाबासाहेब कांबळे, तानाजी पाटील यांच्यासह गटविकास अधिकारी उत्तमराव वाघमोडे, रोजगार हमी योजनेचे अधिकारी व ग्रामसेवकांच्या उपस्थितीत रोजगार हमी योजनेच्या कामांची आढावा बैठक घेण्यात आली. बुरसे यांनी तालुक्यातील गावनिहाय कामांचा ग्रामसेवकांकडून आढावा घेतला. यामध्ये कांही गावात कामांना मंजुरी देण्यात आली नसल्याचे तर मंजूर कामांना कर्मचाऱ्यांकडून काम सुरु करण्यास मोजमापे दिली जात नसल्याने कामे सुरु नाहीत, मस्टर मागणीस टाळाटाळ, पूर्ण झालेल्या कामांचे मस्टर भरुन देऊनही पंचायत समितीतून पूर्ण केलेल्या कामांचा पहिला हप्ताही मिळत नसल्याचे दिसून आले.
दिलीप बुरसे, सतीश निळकंठ, शंकर पाटील व बाबासाहेब कांबळे यांनी लाभार्थ्यांनी कामे पूर्ण करुनही एकही हप्ता न दिल्याबद्दल गटविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाब विचारला. गटविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या एकमेकांकडे बोट दाखविण्याच्या भूमिकेचा पदाधिकाऱ्यांनी समाचार घेतला. रोजगार हमी योजनेंतर्गत कामे रखडण्यास व लाभार्थ्यांची अडवणूक करण्यास प्रशासन जबाबदार असल्याचे लक्षात येताच बुरसे यांनी रखडलेली कामे मार्गी लावून पूर्ण केलेल्या कामांचे हप्ते देण्यात अडवणूक केल्यास दोषींवर कारवाई करण्याचा इशारा दिला. (वार्ताहर)
अर्थपूर्ण तडजोडीचा आरोप
रोजगार हमी योजनेंतर्गत कामे मंजूर करताना विसंगती दिसून येते. ज्या गावांतील कामासाठी अर्थकारण झाले अशा कामांना मंजुरी देण्यात आली आहे. या गावातील लाभार्थ्यांकडून आर्थिक तडजोडी केल्याचा आरोप सदस्य शंकर पाटील यांनी केला.