जिल्हा बँकेतील २३८ कोटींच्या व्यवहारांची चौकशी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:29 IST2021-09-18T04:29:24+5:302021-09-18T04:29:24+5:30
सांगली : जिल्हा बँकेतील अनावश्यक फर्निचर, एटीएम यंत्र, संगणक व नोटा मोजण्याची यंत्रे खरेदी, तसेच केन ॲग्रो, महांकाली, स्वप्नपूर्ती ...

जिल्हा बँकेतील २३८ कोटींच्या व्यवहारांची चौकशी सुरू
सांगली : जिल्हा बँकेतील अनावश्यक फर्निचर, एटीएम यंत्र, संगणक व नोटा मोजण्याची यंत्रे खरेदी, तसेच केन ॲग्रो, महांकाली, स्वप्नपूर्ती शुगर्स या कारखान्यांना दिलेली नियमबाह्य कर्जे याप्रकरणी २३८ कोटींच्या व्यवहारांची चौकशी होणार आहे. सहकार विभागाने शुक्रवारी विभागीय सहनिबंधक डी. टी. छत्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. या समितीला दि. ८ ऑक्टोबरपर्यंत अहवाल देण्यास सांगितले आहे.
जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक आमदार मानसिंगराव नाईक यांच्यासह १२ संचालकांनी दि. ५ एप्रिलरोजी बँकेच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष सुनील फराटे यांनीही तशी मागणी केली होती. या तक्रारींची दखल घेऊन शुक्रवारी सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी चौकशी समिती नियुक्त केली आहे. ही समिती सर्व तक्रारींची चौकशी करणार आहे. जिल्हा बँकेची इमारत बांधकामे, मुख्य कार्यालय व शाखांमधील फर्निचर खरेदी, एटीएम यंत्र, नोटा मोजण्याचे यंत्र यावर आवश्यकता नसताना ३० ते ४० कोटीचा खर्च केला आहे. शिवाय रायगाव (ता. कडेगाव) येथील केन ॲग्रो एनर्जी कारखान्यास बँकेने दिलेल्या कर्जाच्या वसुलीबाबत बेकायदेशीर तडजोड सुरू आहे, असे आक्षेप १२ संचालकांनी घेतले आहेत.
सुनील फराटे यांनी दि. ९ ऑगस्टरोजी तक्रार केली आहे. बँक स्तरावरील सरफेशी कायद्यांतर्गत कर्जदार संस्थांची मालमत्ता विक्री, महिला बचत गटांचे ६० कोटी ६५ लाख रुपयांचे कर्ज निर्लेखन, बँक संचालकांच्या कारखान्यास ३२ कोटीचे कर्ज, निविदा न घेता ७२ कोटी ६८ लाखाची फर्निचर खरेदी, शाखा नूतनीकरणासाठी खर्च, विकास संस्था संगणकीकरणासाठी १९ कोटी ७४ लाख खर्च, महांकाली साखर कारखान्याकडील थांबलेली कर्जाची वसुली, स्वप्नपूर्ती शुगर्स या कारखान्यास चुकीच्या पध्दतीने २३ कोटीचे कर्ज, २९१ तांत्रिक पदांची बोगस कागदपत्रांवर भरती आदी मुद्यांवर त्यांनी तक्रार केली आहे. या तक्रारीची सखोल चौकशी करून समितीने दि. ८ ऑक्टोबरपर्यंत अहवाल सादर करावा, अशी सूचना सहकार आयुक्त कवडे यांनी समितीला दिली आहे.
चौकट
अशी आहे चौकशी समिती
-विभागीय सहनिबंधक डी. टी. छत्रीकर : चौकशी समितीचे अध्यक्ष.
-जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे : समितीचे सदस्य
-विशेष लेखापरीक्षक शीतल चोथे
-जिल्हा विशेष लेखा परीक्षक संजय पाटील,
-विशेष लेखा परीक्षक (सहकारी संस्था) अनिल पैलवान
-अपर लेखा परीक्षक (सहकारी संस्था) रघुनाथ भोसले