बोगस कर्मचारी घोटाळ्याची चौकशी सुरू

By Admin | Updated: April 2, 2015 00:37 IST2015-04-01T23:48:10+5:302015-04-02T00:37:26+5:30

दोषींवर जबाबदारी निश्चित होणार : ४० कर्मचाऱ्यांना काम बंदचे आदेश

Inquiry of bogus staff scam | बोगस कर्मचारी घोटाळ्याची चौकशी सुरू

बोगस कर्मचारी घोटाळ्याची चौकशी सुरू

सांगली : महापालिकेकडे मानधनावर नियुक्त केलेल्या कर्मचारी भरतीत मोठा घोटाळा झाला आहे. भरतीपेक्षा जादा ४० कर्मचारी कामावर असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्यानंतर या कर्मचाऱ्यांना आज, बुधवारपासून काम बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी उपायुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांच्या नेतृत्वाखाली समिती नियुक्त करण्यात आली असून, आठ दिवसांत दोषींवर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दोन वर्षापूर्वी महापालिकेकडील आरोग्य, कचरा उठाव, स्वच्छता विभागाकडे ४०० कर्मचाऱ्यांची मानधनावर नियुक्ती करण्यात आली होती. मध्यंतरी मानधनावरील कर्मचाऱ्यांवर वाद निर्माण झाला. त्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात अतिरिक्त ४० कर्मचारी कामावर असल्याचे दिसून आले होते. या अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या वेतनावर पालिकेकडून लाखो रुपये खर्च करण्यात आले. बोगस कर्मचाऱ्यांचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महापालिकेत खळबळ उडाली होती. आयुक्त अजिज कारचे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत.
महापालिकेने केलेल्या प्राथमिक चौकशीत ४० कर्मचाऱ्यांची बोगस भरती झाल्याचे निदर्शनास आले आहे. या कर्मचाऱ्यांना आजपासून काम बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याशिवाय सर्वच मानधनावरील कर्मचाऱ्यांना त्यांचे नियुक्ती आदेश, आधार कार्ड सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याची छाननी करून प्रत्यक्षात किती बोगस कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली, हे निश्चित होईल. त्यासाठी उपायुक्त डॉ. प्रशांत रसाळ, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे, कामगार अधिकारी के. सी. हळिंगळे यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Inquiry of bogus staff scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.