इनाम धामणीतील स्फोटाची चौकशी
By Admin | Updated: October 25, 2015 00:46 IST2015-10-25T00:45:20+5:302015-10-25T00:46:24+5:30
शॉर्टसर्किटने स्फोट : मालकाचा दावा; वीज कंपनीचे मत मागविले

इनाम धामणीतील स्फोटाची चौकशी
सांगली : इनाम धामणी (ता. मिरज) येथील हिंदविजय कॉलनीतील राजेंद्र वाघमारे यांच्या लॅमिनेशनचा दरवाजा तयार करण्याच्या कारखान्यात झालेल्या केमिकलच्या स्फोटाची सांगली ग्रामीण पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. चौकशीत काय निष्पन्न होते, हे पाहून गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांनी सांगितले. दरम्यान, वाघमारे यांनी शॉर्टसर्किटने आग लागून स्फोट झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी वीज निरीक्षकांचे मत मागविले आहे.
लॅमिनेशनचा दरवाजा तयार करण्यासाठी कोबाल्ट व हार्डनर हे रसायन वापरले जाते. त्यास रेजिन असे म्हटले जाते. हा पदार्थ ज्वलनशील आहे. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता कारखान्यातील कामगार घरी गेल्यानंतर स्फोट सुरू झाले होते. स्फोटातील आगीच्या ज्वाला २० ते २५ फूट अंतरावर येत होत्या. स्फोटाच्या आवाजामुळे ग्रामस्थांनी कारखान्याजवळ गर्दी केली. या गर्दीत ज्वाला येऊन पडल्याने सहाजण जखमी झाले होते. आग विझविताना अग्निशमन दलाचे जवान मुकुंद घोरपडे व गर्दीला हटविणारे ग्रामीण पोलीस ठाण्यातील हवालदार शिवाजी पवार यांच्यासह सहाजण जखमी झाले होते. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या सात गाड्या लागल्या होत्या. केमिकलच्या दुर्गंधीमुळे अनेकजण बेशुद्ध पडले होते.
पोलीस निरीक्षक जाधव म्हणाले, स्फोटात सहाजण जखमी झाले. भरवस्तीत कारखाना सुरू होता. त्यास परवानगी होती का? केमिकलचा साठा करण्याची परवानगी घेतली होती का? या सर्व बाबी तपासातून उजेडात आणल्या जातील. पोलीस, ग्रामस्थ व अग्निशमन दलाने तातडीने मदतकार्य केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. स्फोट नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारखान्याचे मालक राजेंद्र वाघमारे यांनी हा स्फोट शॉर्टसर्किटमुळे झाल्याचा दावा केला आहे. यासाठी वीज वितरणच्या निरीक्षकांना लेखी पत्र पाठवून स्फोट नेमका कशामुळे झाला, याचे मत मागविले आहे. त्यांचे मत आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. (प्रतिनिधी)