पुराच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:27 IST2021-07-27T04:27:39+5:302021-07-27T04:27:39+5:30
सांगली : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १०३ गावात पुराचा फटका बसला आहे. नुकसान झालेल्या सर्व घटकांच्या राज्य शासन पाठीशी असून प्रशासनाने ...

पुराच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा
सांगली : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १०३ गावात पुराचा फटका बसला आहे. नुकसान झालेल्या सर्व घटकांच्या राज्य शासन पाठीशी असून प्रशासनाने पूरस्थिती नियंत्रणात येताच तातडीने पंचनामे सुरू करावेत, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनास दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पूरस्थिती आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
पवार म्हणाले, पाणी सध्या ओसरत असल्याने दिलासा मिळाला असून आता प्रशासनाने पुढील नियोजन करावे. नुकसानभरपाईबाबत येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत सकारात्मक निर्णय घेतला जाईल. पुराचा फटका बसलेले रस्ते, पूल, घरे व शेतीच्या नुकसानीचे प्रशासनाने तातडीने पंचनामे सुरू करावेत.
ऑगस्टमध्ये पुन्हा अशा प्रकारचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. जुलैमध्ये धरणे बऱ्याच प्रमाणात रिकामी असल्याने पडणाऱ्या पावसाचे पाणी धरणांमध्ये साठविणे शक्य झाले. पण आता धरणातही पाणीसाठा झाल्याने पाणी सोडण्याचेही नियोजन करावे लागणार असल्याने प्रशासनाने पुन्हा पुराचा फटका बसू नये यासाठी उपाययोजनांवर भर देण्याचेही सूचना पवार यांनी केली.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, मानसिंगराव नाईक, सुमनताई पाटील, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
चौकट
जिल्हाधिकाऱ्यांकडून निधीची मागणी
जिल्ह्यात नजरअंदाजे ३८ हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून ९१ हजार शेतकऱ्यांना या नुकसानीचा फटका बसला आहे. महावितरणकडील ट्रान्सफॉर्मर, सबस्टेशन, इलेक्ट्रिक लाईन, मीटर यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्याच्या दुरुस्तीसाठी ३४ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी आवश्यक आहे. पूल, मोऱ्या आदींच्या तत्काळ दुरुस्तीसाठी ७४ कोटी २१ लाख, महानगरपालिका क्षेत्रात इमारती व रस्ते दुरुस्तीसाठी ३० कोटी ६७ लाख, यासह अन्य दुरुस्तीसाठीही निधीची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले.