Inquire about the recruitment process of Sangli District Bank | सांगली जिल्हा बँकेच्या भरती प्रक्रियेची चौकशी करा

सांगली जिल्हा बँकेच्या भरती प्रक्रियेची चौकशी करा

सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नुकत्याच करण्यात आलेल्या चारशे लिपिक पदांच्या भरतीची चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदन मंगळवारी काही उमेदवारांच्यावतीने बँक प्रशासन आणि जिल्हा उपनिबंधकांना देण्यात आले. भरती प्रक्रियेची चौकशी न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा बँकेच्या लिपिकवर्गीय चारशे पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र टेक्निकल इस्टिट्यूट आॅफ सॉफ्टवेअर हार्डवेअर अमरावती या कंपनीची नियुक्ती केली होती. कंपनीमार्फत लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल लागला. यानंतर नियुक्त करण्यात आलेल्या समितीने पात्र उमेदवारांची दहा गुणांसाठी तोंडी मुलाखत घेतली. याचा निकाल सोमवारी प्रसिद्ध झाला. मात्र निकालाबाबत परीक्षार्र्थींमध्ये संभ्रम आहे. परीक्षेचा निकाल लागल्यानंतर केवळ नापास उमेदवारांना गुण कळवण्यात आले.

अंतिम निवड यादी उमेदवारांच्या नावासहित न लावता बैठक क्रमांकानुसार लावण्यात आली आहे. निकाल हा कंपनीमार्फत की बँकेमार्फत दिलेला आहे, हेच समजत नाही. याबाबतची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या निवेदनावर अमित पारेकर, जगदीश पाटील, विजयसिंह घोरपडे, सुनील पारेकर, विशाल गायकवाड, विजय पवार, अमित पाटील, मोहन चव्हाण आणि सत्यवान म्हारगुडे यांच्या सह्या आहेत.

Web Title: Inquire about the recruitment process of Sangli District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.