नाल्यांवरील अतिक्रमणांची तातडीने चौकशी करा
By Admin | Updated: December 22, 2016 00:12 IST2016-12-22T00:12:41+5:302016-12-22T00:12:41+5:30
पर्यावरण विभागाचे आदेश : प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिका, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

नाल्यांवरील अतिक्रमणांची तातडीने चौकशी करा
सांगली : जुना बुधगाव रस्त्यावर नैसर्गिक नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणांची तातडीने चौकशी करून पंधरा दिवसांच्या आत अहवाल पाठविण्याचे आदेश पर्यावरण विभागाने जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
शहरातील अतिक्रमणविरोधी कृती समितीने यासंदर्भात पाठपुरावा केला होता. स्थानिक पातळीवर तक्रारीची दखल घेतली न गेल्याने समितीच्या कार्यकर्त्यांनी राज्याच्या पर्यावरण विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत पर्यावरण विभागाचे अवर सचिव का. सु. लंगोटे यांनी नुकतेच यासंदर्भात चौकशीचे आदेश महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले. नाल्यांवरील अतिक्रमणांमुळे पर्यावरणाची हानी होत असल्याची तक्रार असल्याने, याबाबतचा अहवाल तातडीने १५ दिवसांच्या आत सादर करावा, अशीही सूचना त्यांनी केली आहे.
समितीने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जुना बुधगाव रस्त्याच्या पश्चिम व पूर्व बाजूस पूरपट्टा आहे. तसेच नैसर्गिक स्रोत व नाले अस्तित्वात आहेत. त्यामुळे याठिकाणी कोणत्याही प्रकारचे बांधकाम अगर जमिनींची खरेदी-विक्री करता येत नाही. तरीही गेल्या काही वर्षांत या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे वाढली आहेत. एका व्यावसायिकाने सर्व्हे क्र. १२३ मधील नाला बुजविला असून, त्यावर बेकायदेशीररित्या प्लॉट पाडून त्यांची विक्रीही केली आहे. हरितपट्ट्यातील या जमिनींचे व्यवहार करून बांधकामासही सुरुवात झाली आहे. त्यामुळे
संबंधित व्यावसायिक फौजदारी कारवाईस पात्र आहे.नाल्यांवरील अतिक्रमणांविरोधात शासनस्तरावर समितीचे अध्यक्ष संजय जाधव, कार्याध्यक्ष जयंत जाधव, अवधूत पळसे, सद्दाम खाटिक, नीलेश पाटील, मकरंद म्हामुलकर, शेखर पवार, योगेश जाधव, अमित देसाई, प्रवीण सावंत, वाजीद अपराध, महेश इंगवले, उत्कर्ष राजपूत, सागर लोहार यांनी पाठपुरावा केला होता. (प्रतिनिधी)