पालिकेची चौकशी करा, पण बदनामी नको
By Admin | Updated: September 21, 2015 00:07 IST2015-09-20T22:35:31+5:302015-09-21T00:07:13+5:30
सुधीर गाडगीळांच्या आरोपाने खळबळ : घोटाळे सिद्ध न झाल्यास राजीनामा देण्याची मागणी

पालिकेची चौकशी करा, पण बदनामी नको
सांगली : सांगली महापालिकेत पाचशे कोटींचा घोटाळा झाल्याच्या, भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या आरोपबॉम्बने शहरात खळबळ उडाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीप्रणित विकास महाआघाडीच्या कारभारावर त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली आहे. खरंच, पालिकेत घोटाळे झाले असतील, तर त्यांची चौकशी झाली पाहिजे. दोषींवर कारवाई व्हावी, पण केवळ राजकीय विरोधातून महापालिकेची बदनामी नको, अशी प्रतिक्रियाही सर्वच स्तरातून उमटत आहे.
सत्ताधारी काँग्रेसने तर गाडगीळांनाच कात्रीत धरण्याची तयारी चालविली आहे. घरकुल, पाणीपुरवठासह एचसीएल व इतर योजनांचा निधी महाआघाडीच्या काळात खर्च झाला आहे. त्यामुळे ज्या महाआघाडीने त्यांना विधानसभेवेळी मदत केली, तीच अडचणीत येत असेल, तर काँग्रेसने या संधीचा फायदा घेण्याची तयारी सुरू केली आहे. गेल्या दोन वर्षात ड्रेनेजमधील आराखडाबाह्य कामे वगळता, काँग्रेसवर फार मोठे आरोप झालेले नाहीत. पाणी खासगीकरणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर असला तरी, त्याचा ठरावही महाआघाडीच्या काळातच झाला आहे. तेव्हा या घोटाळ्याची पारदर्शी चौकशी व्हावी, अशीच अपेक्षा काँग्रेस करीत आहे. (प्रतिनिधी)
भाजपचे नगरसेवक काय करीत होते?
महापालिकेत पाचशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी केला आहे. विकास महाआघाडीच्या तीन व काँग्रेसच्या गेल्या दोन वर्षातील कारभाराच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. महाआघाडीच्या सत्तेत भाजपही सहभागी होता. या सत्तेत सलग पाच वर्षे भाजपकडेच उपमहापौरपद होते, तर त्यांच्याच ज्येष्ठ नगरसेवकाला स्थायी समिती सभापतीपदही दिले होते. आताच्या काँग्रेस सत्ताकाळातही भाजपचे संख्याबळ सहा ते सातच्या घरात आहे. मग घोटाळे होत असताना या नगरसेवकांनी कधी तोंड का उघडले नाही?, असा सवाल उपमहापौर प्रशांत पाटील यांनी उपस्थित केला.