एमपीएससी परीक्षेत धनगर समाजावर अन्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:26 IST2021-08-15T04:26:51+5:302021-08-15T04:26:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध पदांसाठी सरळ सेवा भरतीसाठी प्रलंबित पडलेली प्रक्रिया पुन्हा सुरू केली ...

एमपीएससी परीक्षेत धनगर समाजावर अन्याय
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध पदांसाठी सरळ सेवा भरतीसाठी प्रलंबित पडलेली प्रक्रिया पुन्हा सुरू केली असली तरी मागील जाहिरातीत धनगर समाजासाठी केवळ दोन जागा आरक्षित ठेवून अन्याय करण्यात आला आहे. बिंदू नामावलीसहीत सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्याची मागणी मल्हार क्रांती बहुउद्देशीय सेवा संस्थेच्यावतीने करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तानाजी व्हनमाने यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १४ जुलै २०१९ रोजी विविध पदांसाठी सरळ सेवा भरतीची जाहिरात प्रकाशित केली होती. या जाहिरातीत पोलीस उपनिरीक्षक पदाच्या ६५० जागा भरणार असल्याचे जाहीर केले होते, मात्र, यात एनटी (क) साठी केवळ २ जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.
धनगर समाजातील विद्यार्थ्याच्या तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रकार असून आयोगाने बिंदू नामावलीनुसार सुधारित जाहिरात प्रकाशित करून हा अन्याय दूर करावा. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून बिंदू नामावली लक्षात घेऊन परीक्षेची जाहिरात प्रकाशित करण्यात येते. विविध प्रवर्गांसाठी नियमानुसार जागा आरक्षित ठेवण्यात येतात. ६५० पोलीस निरीक्षकांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यात बिंदू नियमावलीला चक्क खुंटीवर टांगून ठेवण्यात आले आहे. बिंदू नियमावलीनुसार एनटी (क) अर्थात धनगर समाजासाठी ३.५ टक्के म्हणजेच २३ जागा आरक्षित असणे गरजेचे होते. परंतु धनगर समाजासाठी केवळ २ जागा देऊन अन्याय केलेला आहे.
चौकट
परीक्षा होऊ देणार नाही
धनगर समाजाची कायदेशीर मागणी मान्य केली नाही, तर ४ सप्टेंबर रोजीची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा होऊ देणार नाही. आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील. त्यावेळेस जर का कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर सर्वस्वी महाराष्ट्र शासनाची जबाबदारी राहील, असा इशारा व्हनमाने यांनी दिला आहे.