धनगावला सोयाबीनवर अळ्यांचा प्रादुर्भाव
By Admin | Updated: July 23, 2014 23:00 IST2014-07-23T22:53:06+5:302014-07-23T23:00:06+5:30
शेतकऱ्यांत चिंता : पिकांना रोगाचा फटका

धनगावला सोयाबीनवर अळ्यांचा प्रादुर्भाव
भिलवडी : धनगाव (ता. पलूस) येथील भागात सोयाबीन पिकावर पाने व शेंगा कुरतडणाऱ्या अळ्यांनी हल्ला चढविल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे.
मे महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी पाणी देऊन भागात सोयाबीनची लागवड केली. यंदा पावसाळा महिनाभर लांबल्याने खरीप सोयाबीनची नैसर्गिकपणे योग्य अशी वाढ झाली नाही. पाऊस नसल्याने वातावरण दमट असल्याने विविध रोगांसह अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
काळ्या रंगाच्या या अळ्या असून सोयाबीनची पाने व शेंगा कुरतडून त्या फस्त करीत आहेत. या अळ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने दोन-चार दिवसात एकरावर पीक खाऊन त्या फस्त करतात.
निसर्गावर मात करीत अगाप सोयाबीनचे विक्रमी पीक घेणाऱ्या धनगावमधील शेतकऱ्यांना पाने कुरतडणाऱ्या अळ्यांच्या प्रादुर्भावाने हाता-तोंडाशी आलेली पिके वाया जाण्याचा शक्यतेने चिंंतेचे वातावरण आहे. (वार्ताहर)