रेल्वे वसाहतीत घुसखोरांचा शिरकाव
By Admin | Updated: February 12, 2015 00:34 IST2015-02-11T22:40:43+5:302015-02-12T00:34:33+5:30
मिरजेतील प्रकार : कर्मचाऱ्यांनी नेमले पोटभाडेकरू

रेल्वे वसाहतीत घुसखोरांचा शिरकाव
मिरज : मिरजेत रेल्वे कर्मचारी वसाहतीत रेल्वे कर्मचाऱ्यांशिवाय घुसखोरांनी शिरकाव केला आहे. कर्मचारी वसाहतीच्या देखभाल दुरूस्तीसाठी रेल्वे कोट्यवधी रूपये खर्च करीत असताना त्याचा फायदा वसाहतीत वास्तव्य करणारे घुसखोर घेत असल्याचे चित्र आहे. मिरज रेल्वेस्थानकात विविध विभागात सुमारे दीड हजार कर्मचारी काम करतात. रेल्वे स्थानकालगत कोल्हापूर चाळ व माणिकनगर या नावाने ओळखली जाणारी कर्मचारी वसाहत आहे. येथे श्रेणी एक ते चार पर्यंतची ४७० घरे आहे. कर्मचारी वसाहतीस व रेल्वेस्थानकास पाणीपुरवठ्यासाठी रेल्वेने सुमारे चार कोटी रूपये खर्चून कृष्णा नदीतून स्वत:ची नळपाणीपुरवठा यंत्रणा कार्यान्वित केली आहे. अत्यंत कमी दरात रेल्वे कर्मचारी वसाहतीत पाणीपुरवठा करण्यात येतो. रेल्वे कर्मचाऱ्यांना केवळ एक हजार ते दोन हजार रूपयात घर मिळते. रेल्वेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांना येथे घरे देण्यात आली आहेत. मात्र घरे मिळालेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी आपली घरे इतरांना जादा भाड्याने दिली आहेत. रेल्वेवसाहतीत कर्मचाऱ्यांशिवाय वास्तव्य करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षात मोठ्याप्रमाणात वाढली आहे. गरजू रेल्वे कर्मचारी रेल्वेच्या घराच्या प्रतीक्षेत असताना घरे मिळालेल्या काही कर्मचाऱ्यांनी घरात पोटभाडेकरू ठेवल्याने याबाबत तक्रारी सुरू आहेत. रेल्वे कर्मचारी वसाहतीतील घरांच्या देखभाल दुरूस्तीसाठी प्रतिवर्षी सुमारे ७० लाख रूपये खर्च होतात. रेल्वे वसाहतीत बंद व मोकळ्या असलेल्या घरांवरही काहीजणांनी अवैध कब्जा केल्याची माहिती मिळाली. नियमबाह्य पध्दतीने घरे भाड्याने देणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांवर कारवाईची शिफारस करण्याचे अधिकार रेल्वेच्या बांधकाम निरीक्षकांना आहेत. मात्र मिरज विभागातील कोल्हापूर ते साताऱ्यापर्यंत विविध स्थानकाच्या परिसरात रेल्वे कर्मचारी वसाहतीत हजारो घरांच्या देखभाल दुरूस्ती कामात व्यस्त असल्यामुळे बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा घुसखोरांनी फायदा घेतला आहे. रेल्वे कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर एका महिन्यात घर सोडण्याचा नियम आहे. मात्र सेवानिवृत्तीनंतरही काही कर्मचारी वर्षानुवर्षे रेल्वे वसाहतीत तळ ठोकून आहेत. ‘आंधळं दळतंय...’ अशा कारभारामुळे गरजू रेल्वे कर्मचारी मात्र घराच्या सुविधेपासून वंचित असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)