आटपाडी-शेटफळे महामार्गाचे काम निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:25 IST2021-02-10T04:25:34+5:302021-02-10T04:25:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क करगणी : आटपाडी तालुक्यातून जात असलेल्या दिघंची-हेरवाड महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून महामार्ग अनेक ठिकाणी ...

आटपाडी-शेटफळे महामार्गाचे काम निकृष्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
करगणी : आटपाडी तालुक्यातून जात असलेल्या दिघंची-हेरवाड महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून महामार्ग अनेक ठिकाणी खचला आहे. अर्धवट बांधलेल्या पुलावरील संरक्षक कठडे कमकुवत आहेत. याबाबत बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
दिघंची-हेरवाड महामार्ग क्रमांक १५४ चे काम आटपाडी तालुक्यात सुरू आहे. आटपाडीपासून शेटफळे-पात्रेवाडी-कोळा-पाचेगाव-घाटनांद्रे-सलगरे असे मार्गाचे काम सुरू आहे. सध्या आटपाडी ते कोळे तीस किलोमीटरपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. या महामार्गावरील डांबरीकरणाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. अनेक ठिकाणी डांबरीकरण खचले आहे. काम सुरू असतानाच महामार्गच खचत असल्याने त्यांच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे. महामार्ग खचत असल्याने महामार्गावर अनेक ठिकाणी अपघाताला निमंत्रण मिळत आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी छोटे-मोठे पूल बांधण्यात आले आहेत. या पुलांवरील संरक्षक कठडे हे अधांतरीच ठेवण्यात आल्याने सहज ढकलल्यास ते पडत आहेत. अतिशय निकृष्ट दर्जाचे कठडे बनवले गेले आहेत. शिवाय ते कमी उंचीचे बनवले आहेत. यामुळे नेमके कशाचे संरक्षण केले जाईल, हा संशोधनाचा विषय बनला आहे.
चाैकट
लावलेली झाडे चालली जळून
दरम्यान, महामार्गाच्या दुतर्फा ठेकेदाराने नव्याने लावलेली झाडे सध्या जळून चालली आहेत. या झाडांना पाणी घातले जात नसल्याने सध्या फक्त झाडांऐवजी काट्याचा उभा केलेला सांगाडा राहिला आहे. महामार्ग बनवत आसताना शेकडो झाडे तोडली गेली असल्याने सध्या रस्ता भकास दिसू लागला आहे.
फोटो : ०९करगणी १
ओळ : आटपाडी तालुक्यात महामार्गाच्या बाजूला लावलेली झाडे सध्या पाण्याअभावी वाळून चालली आहेत.
फोटो : ०९करगणी २
आटपाडी तालुक्यात महामार्गावरील निकृष्ट दर्जाचे संरक्षक कठडे अपघातांना निमंत्रण देणारे ठरत आहेत.