समाजाच्या ‘डीएनए’मध्येच विषमता

By Admin | Updated: December 15, 2015 00:32 IST2015-12-15T00:06:22+5:302015-12-15T00:32:12+5:30

नीरजा : इस्लामपुरात एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन उत्साहात

Inequality in society's DNA | समाजाच्या ‘डीएनए’मध्येच विषमता

समाजाच्या ‘डीएनए’मध्येच विषमता

इस्लामपूर : कालबाह्य स्त्रीवादी परंपरांना कवटाळून बसलेल्या समाजाच्या डीएनएमध्येच विषमता आहे. सामाजिक विषमतेची ही एक बाजू असतानाच, आता कथाकथित संस्कृती रक्षकांकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालून भयाची परिस्थिती निर्माण केली जात आहे. अशावेळी साहित्यिकांनी नवा विचार देणारे आणि समाजाला भान देणारे साहित्य निर्माण करायला हवे, असे मत प्रसिध्द कवयित्री नीरजा यांनी व्यक्त केले.
लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र साहित्य परिषद व राजारामबापू ज्ञानप्रबोधिनीच्यावतीने रविवारी आयोजित २३ व्या एकदिवसीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरुन कवयित्री नीरजा बोलत होत्या.
संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. वि. रा. तोडकर यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. ज्ञानप्रबोधिनीचे कार्यवाह प्रा. शामराव पाटील, प्राचार्या डॉ. दीपा देशपांडे, स्वागताध्यक्ष एस. टी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. संमेलनाच्या सुरुवातीस शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांना आदरांजली वाहण्यात आली.
कवयित्री नीरजा म्हणाल्या, अखिल भारतीय संमेलनांपेक्षा छोट्या संमेलनांतून गंभीरपणे विचार मांडले जातात. सध्या असहिष्णुतेच्या वातावरणामुळे प्रामाणिकपणे व्यक्त होणे देखील अडचणीचे ठरत आहे. या दबावाच्या वातावरणाशी संघर्ष करण्यात साहित्यिकांचा वेळ जातो आहे. जातीअंताच्या लढ्याकडे ज्या गांभीर्याने पाहिले जाते, तेवढ्या गांभीर्याने स्त्रीमुक्तीकडे पाहिले जात नाही. स्त्रीला सत्तेपेक्षा समानता हवी आहे.
प्रा. डॉ. वि. रा. तोडकर म्हणाले, केशवसूत, मर्ढेकर, नारायण सुर्वे यांच्या परंपरेतील स्त्रीविश्वाचे वर्णन करणाऱ्या कवयित्री नीरजा या एक महत्त्वाच्या साहित्यिक आहेत. त्यांच्या कथा व कवितांमधील एकही वाक्य सुटणार नाही, अशी गोडी वाचकाला लागून राहते, असेही तोडकर यांनी सांगितले.
यावेळी शहानवाज मुल्ला यांच्या ‘दु:ख उराशी आले’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन मिरजे यांच्याहस्ते करण्यात आले, तर ‘लोकनेते राजारामबापू पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती’ पुरस्कार पांडुरंग मोरे यांच्या ‘आथारी’ या कथासंग्रहास, तसेच समाधान महाजन यांच्या ‘अस्वस्थ क्षणाचे पाश’ या काव्यसंग्रहास देण्यात आला.
स्वागताध्यक्ष एस. टी. पाटील यांनी स्वागत केले. प्राचार्य डॉ. दीपा देशपांडे यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला. प्रा. दशरथ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मंगल कोकाटे यांनी आभार मानले.
यावेळी प्राचार्य विश्वास सायनाकर, प्रा. प्रदीप पाटील, प्रा. राजा माळगी, प्रा. दीपक स्वामी, प्रा. सुभाष खोत, वैजयंती पेठकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)


संघर्षात वेळ जातो : स्त्रीमुक्तीबाबत गंभीर व्हा


सध्या असहिष्णुतेच्या वातावरणामुळे प्रामाणिकपणे व्यक्त होणे देखील अडचणीचे ठरत आहे.
दबावाच्या वातावरणाशी संघर्ष करण्यात साहित्यिकांचा वेळ जातो आहे.
जातीअंताच्या लढ्याकडे ज्या गांभीर्याने पाहिले जाते, तेवढ्या गांभीर्याने स्त्रीमुक्तीकडे पाहिले जात नाही.
अखिल भारतीय संमेलनांपेक्षा छोट्या संमेलनांतून गंभीरपणे विचार मांडले जातात.
स्त्रीला सत्तेपेक्षा समानतेची गरज आहे.

Web Title: Inequality in society's DNA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.