जिल्ह्यातील उद्योजकांचा उद्या बंद
By Admin | Updated: February 26, 2015 00:08 IST2015-02-25T23:35:54+5:302015-02-26T00:08:00+5:30
औद्योगिक संघटनांचा निर्णय : वीज दरवाढीचा निषेध; अधीक्षक अभियंता कार्यालयावर मोर्चा

जिल्ह्यातील उद्योजकांचा उद्या बंद
कुपवाड : महावितरण कंपनीने इतर राज्यांच्या तुलनेत केलेल्या दुप्पट दरवाढीच्या निषेधार्थ शुक्रवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सर्व उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय आज मिरजेत झालेल्या औद्योगिक संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला़ त्याचदिवशी सकाळी ११ वाजता विश्रामबाग चौकातून अधीक्षक अभियंता कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून, वीज बिलांची होळी करण्यात येणार आहे.महावितरण कंपनीकडून राज्यातील उद्योजकांवर इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक दरवाढ केली होती. त्यावेळी उद्योजकांनी लोकप्रतिनिधींची भेट घेऊन या होऊ घातलेल्या दरवाढीचा निषेध नोंदविला होता. तसेच याविरोधात आंदोलनाचा इशाराही दिला होता. तरीही या निषेधाची दखल शासनाने घेतली नाही. त्यांनी ३१ टक्के दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. ही वीज दरवाढ प्रचंड असून, इतर राज्यांच्या तुलनेत दुप्पट आहे. या दरवाढीच्या विरोधात राज्यातील उद्योजकांनी ३ फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी बैठक घेऊन तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला.
त्या बैठकीमध्ये ठरल्यानुसार जिल्ह्यातील उद्योजकांनीही आज मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या कार्यालयात बैठक घेतली. त्या बैठकीतही महावितरणने केलेल्या दुप्पट दरवाढीचा निषेध नोंदविला. तसेच शुक्रवारी सांगली व परिसरातील सर्व उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याचदिवशी सकाळी विश्रामबाग चौकातून महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर मोर्चा काढण्याबरोबरच वीज बिलांची होळीही करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यानंतरही शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा उद्योजकांकडून देण्यात आला आहे. बैठकीमध्ये सांगली, मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय अराणके, उमेद उद्योग समूहाचे प्रमुख सतीश मालू, कृष्णा व्हॅली चेंबरचे उपाध्यक्ष रमेश आरवाडे, सेक्रेटरी पांडुरंग रूपनर, वसंतदादा औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष सचिन पाटील, हेमंत महाबळ, दीपक शिंदे, के. एस. भंडारे, सतीश वाघ, शंकरराव तायशेट्टी, हर्षल खरे, दीपक मर्दा, विजय भोसले, अरविंद जोशी, अशोक भोसले, गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहतीचे योगेश जोशी, डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या प्रभाताई कुलकर्णी, गणेश निकम आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
भ्रष्टाचार लपविण्यासाठी दरवाढ
वीजगळती, अकार्यक्षम कारभार व भ्रष्टाचार लपविण्यासाठी ही दरवाढ केली आहे. इतर राज्यात कार्यक्षम कारभार सुरू असल्यामुळे तेथे कमी दराने वीज मिळते. महाराष्ट्रात का दर कमी होत नाहीत. यांची अकार्यक्षमता ग्राहकांच्या माथी मारली जात आहे. या दरवाढीमुळे उद्योजकांचे कंबरडेच मोडणार आहे, असे मत सांगली-मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय अराणके यांनी व्यक्त केले.