‘इंदिरा आवास’ घोटाळ्याची चौकशी होणार
By Admin | Updated: January 13, 2016 23:23 IST2016-01-13T23:23:01+5:302016-01-13T23:23:01+5:30
नियामक मंडळाच्या बैठकीत निर्णय : सात आमदार, खासदारांची दांडी

‘इंदिरा आवास’ घोटाळ्याची चौकशी होणार
सांगली : तांदूळवाडी (ता. वाळवा) गावासह जिल्ह्यातील सर्वच इंदिरा आवास घरकुल योजनेच्या निधी वाटपाची सखोल चौकशी करण्याची मागणी बुधवारी नियामक मंडळाच्या बैठकीत करण्यात आली. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या बैठकीस सात आमदार आणि खासदारांनी दांडी दिल्यामुळे उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली.
जिल्हा परिषद अध्यक्षा होर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण विकास यंत्रणेकडील नियामक मंडळाची बैठक जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात झाली. या बैठकीस आमदार विलासराव जगताप, नियामक मंडळाचे अशासकीय सदस्य प्रकाश पाटील, रोहिदास सातपुते, अनुराधा शिंदे, आटपाडी पंचायत समितीच्या सभापती सुमन देशमुख, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, प्रकल्प संचालक अजयकुमार माने आदी उपस्थित होते. नियामक मंडळाच्या बैठकीस सर्व आमदार, दोन खासदारांना निमंत्रित केले होते. पण, या बैठकीस केवळ आ. जगताप उपस्थित होते. उर्वरित सात आमदार आणि दोन खासदारांनी दांडी दिली.
नियामक मंडळाचे अशासकीय सदस्य व वाळवा पंचायत समितीचे सदस्य प्रकाश पाटील यांनी तांदुळवाडी येथील इंदिरा आवास घरकुल योजनेतील लाभार्थींच्या निधीच्या घोटाळ्याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आ. जगताप यांनीही, घरकुल योजनेतील निधीवर जर कोण डल्ला मारत असेल, तर त्याची सखोल चौकशी करून ग्रामसेवक आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे, असे सांगितले.
होर्तीकर व दिलीप पाटील यांनी तांदुळवाडी घरकुल घोटाळ्याची चौकशी करून दोषी कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. इंदिरा आवास घरकुल योजनेचा आढावा घेऊन निधीतील घोटाळा झाला आहे का, याचाही शोध घेतला जाईल, असे आश्वासन दिले.
शेतकऱ्यांना पीक कर्ज आणि मुद्रा योजनेतील कर्ज देण्याकडे बँका दुर्लक्ष करीत आहेत, असा सदस्यांनी आरोप केला. यावेळी सर्व बँकांची बैठक घेऊन कर्ज वाटपाचा आढावा घेण्यात येईल, असे आश्वासन माने यांनी दिले. (प्रतिनिधी)
पीक विम्याचा लाभ द्या
खरीप हंगामामध्ये पाऊस कमी झाल्याने खरीप पिकांचे ५० टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ झाला आहे का, याचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल घ्यावा. एकही शेतकरी विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना जगताप यांनी दिली.