मदनभाऊ गटाचा स्वतंत्र झेंडा
By Admin | Updated: November 15, 2016 00:33 IST2016-11-14T23:18:42+5:302016-11-15T00:33:30+5:30
प्रदेशाध्यक्षांसमोर प्रकार : ना कदम गटाचे, ना दादा गटाचे, आम्ही सर्व भाऊ गटाचे!

मदनभाऊ गटाचा स्वतंत्र झेंडा
सांगली : दादा व कदम गटातील वाद मिटविण्यासाठी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी घेतलेल्या बैठकीत मदनभाऊ गटाने अस्तित्वाचा स्वतंत्र झेंडा फडकवला. पक्षातील वाद मिटवून एकसंधपणे कॉँग्रेसची वाटचाल व्हावी, अशी अपेक्षा ते व्यक्त करू लागल्यानंतर गटबाजीतून सुरू असलेल्या कुरघोड्यांचे खरे स्वरूप त्यांच्यासमोर उघड झाले.
सांगली-मिरज रस्त्यावर पोलिस मुख्यालयाजवळील एका हॉटेलमध्ये रविवारी अशोक चव्हाण यांनी गटबाजीचे राजकारण संपविण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीस दादा व कदम गटातील नेते, कार्यकर्ते तसेच मदनभाऊंच्या गटातील महापौर हारुण शिकलगार, गटनेते किशोर जामदार, स्थायी समितीचे माजी सभापती संतोष पाटील, राजेश नाईक यांच्यासह सहा ते सातजण उपस्थित होते. दोन्ही गटातील नेत्यांचे म्हणणे ऐकून घेत असताना, चव्हाण यांनी महापौर व अन्य नगरसेवकांना ‘तुम्ही कोणत्या बाजूने आहात’, असा सवाल केला.
महापौर म्हणाले, ‘आम्ही ना दादा गटाचे आहोत, ना कदम गटाचे, आम्ही मदनभाऊंच्या गटातील आहोत. सध्या जयश्रीताई पाटील आमच्या नेत्या आहेत.’ चव्हाण यांनाही या गोष्टीचे आश्चर्य वाटले. गटांमध्ये विभागालेली कॉँग्रेस एकसंध व्हायला हवी, अशी अपेक्षा प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केली. त्यानंतर गटबाजीच्या राजकारणातून सुरू असलेल्या कुरघोड्यांच्या कहाण्या चव्हाण यांच्यासमोर सर्वांनी मांडल्या. चव्हाण यांना या गोष्टींची कल्पना यापूर्वी होती. तरीही त्यांचे तीव्र स्वरूप त्यांनी या बैठकीत अनुभवले.
गेल्या काही दिवसांपासून मदनभाऊ गटाची घुसमट सुरू आहे. कदम गटाशी जुळवून घेतलेल्या मदनभाऊंच्या गटाचे सूर माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, त्यांचे बंधू विशाल पाटील यांच्या गटाशी अद्याप जुळलेले नाहीत. रविवारी वसंतदादा जन्मशताब्दी सोहळ््यावेळीही याच गोष्टीचे दर्शन झाले. जयश्रीतार्इंसह त्यांचा संपूर्ण गट मुख्य कार्यक्रमास गैरहजर राहिला.
मदनभाऊ पाटील यांच्या पश्चात या गटाच्या नगरसेवक व कार्यकर्त्यांनी जयश्रीतार्इंचे नेतृत्व स्वीकारले आहे. जयश्रीतार्इंना सक्रिय राजकारणात रस दिसत नसला तरी, कार्यकर्त्यांनी त्यांच्याच नेतृत्वाचा धागा घट्ट पकडला आहे. कदम गटाशी मदनभाऊंनी जुळवून घेतल्यानंतर आजही हा गट कदम यांच्या हाकेला धावून जातो, मात्र प्रतीक पाटील, विशाल पाटील गटाकडे नेहमीच पाठ फिरवितो. वसंतदादांच्या घराण्यातच पडलेले दोन गट एकत्र येण्याची शक्यता फार कमी आहे. जयश्रीतार्इंचे नेतृत्व सुटले, तर विनाकारण मोठी फरफट होईल, अशी भीती मदनभाऊ गटाला आहे. त्यामुळे जयश्रीतार्इंच्या नेतृत्वाला त्यांनीच बळ देण्यास सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)
नगरसेवकांमध्ये नाराजी
जन्मशताब्दी सोहळ्याचे नियोजन करण्यात येत असताना दादा गटाकडून जयश्रीताई पाटील यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने मदनभाऊ गटाचे नगरसेवक नाराज झाल्याचे सांगण्यात येते. ही नाराजी त्यांनी उघडपणे चव्हाण यांच्यासमोर बोलूनही दाखविली. त्यामुळेच या गटाने जन्मशताब्दीच्या कार्यक्रमाकडे ठरवून पाठ फिरविली. वसंतदादांच्या स्मारकाचे दर्शन घेऊन सर्वजण परतले.
उपस्थितीवरून वाद
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसमोर वसंतदादांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या उपस्थितीवरून वाद झाला. महापौर हारूण शिकलगार यांचे नाव पत्रिकेत असतानाही मुख्य समारंभाला ते गैरहजर राहिले. याचा जाब विचारण्यात आला. तेव्हा महापौरांनी वसंतदादांच्या स्मारकाच्या दर्शनाला उपस्थित होतो. कामानिमित्त सोहळ्याला उपस्थित राहता आले नाही, असा खुलासा केला.