बांधकाम कामगारांचे बुधवारपासून बेमुदत धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:26 IST2021-08-29T04:26:26+5:302021-08-29T04:26:26+5:30
सांगली : पुरामध्ये घर बुडालेल्या कामगारांना बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या योजनेनुसार प्रत्येकी घरासाठी दोन लाख रुपये मिळावेत, यासह विविध ...

बांधकाम कामगारांचे बुधवारपासून बेमुदत धरणे आंदोलन
सांगली : पुरामध्ये घर बुडालेल्या कामगारांना बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या योजनेनुसार प्रत्येकी घरासाठी दोन लाख रुपये मिळावेत, यासह विविध मागण्यांसाठी निवारा बांधकाम कामगार संघटनेतर्फे बुधवार, दि. १ सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष कॉ. शंकर पुजारी यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्र शासनाने बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत नोंदित बांधकाम कामगारांना प्रत्येकी पाच हजार रुपये दिले होते. या वर्षी मात्र फक्त पंधराशे रुपये दिले आहेत. उर्वरित साडेतीन हजार रुपये रक्कम मिळावी. बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत असा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेतलेला आहे की, नोंदित बांधकाम कामगारांच्या मुलीच्या लग्नासाठी ५० हजार रुपये देण्यात येतील. अनेक वेळा संघटनांनी मागणी करूनही कामगार मंत्री व महाराष्ट्र शासनाने अद्याप या महत्त्वाच्या ठरावास मंजुरी दिली नाही. विशेषत: सध्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी उपकरामधून जमा झालेले अकरा हजार कोटी रुपये शिल्लक आहेत. तरीही निर्णय होत नसल्यामुळे महाराष्ट्र शासनाचा बैठकीमध्ये निषेध करण्यात आला.
बैठकीस युनियनचे सरचिटणीस कॉ विजय बचाटे, इतर पदाधिकारी वर्षा गडचे, शीतल मगदूम, सुरेश सुतार, राम कदम, प्रकाश कुंभार, शिराज शेख, सुनंदा कांबळे, आदी उपस्थित होते. युनियनचे सरचिटणीस कॉ. विजय बचाटे यांनी आभार मानले.