'‘वाढीव नळपाणी’चा बागुलबुवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2016 00:13 IST2016-05-11T23:08:52+5:302016-05-12T00:13:20+5:30
निवडणूक डोळ्यासमोर : पाण्याचा अनुशेष भरण्यासाठी नवा बहाणा

'‘वाढीव नळपाणी’चा बागुलबुवा
प्रकाश वराडकर --- रत्नागिरी -गेल्या आठ वर्षांत रत्नागिरीकरांना अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा झाला असताना आता घाई-गडबडीत पाण्याचा अनुशेष भरून काढण्याचा नवा बहाणा कारभाऱ्यांना मिळाला आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर ६८ कोटींच्या वाढीव नळपाणी योजनेचा बागुलबुवा रत्नागिरीकरांसमोर उभा करण्यात आला आहे. हा बागुलबुवा खरोखरच सत्यात उतरणार की आश्वासनांचे पोतडे आणखी एका आश्वासनाने भरणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काही योजना मतांच्या आशेने लोकांच्या तोंडावर फेकल्या जातात. त्यात राजकीय गणितांची जुळवाजुळव असते, हे न समजण्याएवढी जनता आता खुळी राहिलेली नाही. सैन्य पोटावर चालते. त्यांना पोटापाण्याची रसद पुरवली नाही, तर ते लढू शकणार नाही. तसेच पाण्याच्याबाबत आहे. पाणी हे जीवन आहे. पाण्याचे महत्व वेगळे सांगण्याची गरज नाही. परंतु पाण्याचाही जीवन - मरणाचा प्रश्न गेल्या आठ वर्षांच्या काळात गंभीर बनलेला असतानाही त्या त्या वेळच्या कारभाऱ्यांना तो सोडवता आला नाही. कागदावर पाणी वाहात राहिले ते नळातून आलेच नाही. त्यामुळे अपुऱ्या पाणी समस्येला रत्नागिरीकरांना सातत्याने अनेक वर्षे तोंड द्यावे लागत आहे. त्यांच्या घरी नळाला पुरेसे पाणी आले नाही. मात्र, पाणी समस्येने त्यांच्या डोळ्यात या कारभाऱ्यांनी पाणी आणले, हे कटू सत्य आहे.
गेल्या दीड महिन्यापूर्वी रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी शासनाकडे रत्नागिरीसाठी वाढीव पाणी योजनेचा प्रस्ताव दिला. गेल्या आठवड्यात वाढीव पाणी योजनेचा ठराव मंजूर करून शासनाकडे पाठवा, असा आदेश आला. महाराष्ट्र राज्य नगरोत्थान कार्यक्रमांतर्गत ६८.४० कोटींच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचा ठराव गेल्या शुक्रवारी विशेष सभेत मंजूर करून तो शासनाला पाठवण्यात आला आहे. खरेतर नगरोत्थान योजना दोन वर्षांपासून सुरू आहे. त्यावेळेपासून रत्नागिरीच्या नळपाणी योजनेच्या नूतनीकरणासाठी निधी मागण्याचा विषय सुरू होता. असे असताना गेल्या वर्षभरात केवळ चर्चाच होत राहिली. आता निवडणुकांच्या तोंडावर हा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. त्याआधी असा प्रस्ताव गेला असता तर एवढ्यात या योजनेचे नूतनीकरण पूर्णही झाले असते. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हेच त्याचे कारण असल्याचा आरोप शहरवासीय करीत आहेत.
शासनाकडे पाठवलेल्या या ६८.४० कोटींच्या प्रस्तावानुसार शीळ ते साळवी स्टॉप व पानवल ते नाचणेपर्यंतच्या मुख्य जलवाहिन्या बदलल्या जाणार आहेत. या दोन्ही जलवाहिन्या गंजल्या असून जागोजागी फुटल्या आहेत. त्यातून पाणी मोठ्या प्रमाणात गळती होत असून, वाया जात आहे. शहरातील प्रत्येक प्रभागातील जलवाहिन्यांचे जुने जाळे पूर्णत: काढून त्याजागी ४ इंचापेक्षा अधिक व्यासाच्या नवीन जलवाहिन्या टाकल्या जाणार आहेत. शहरातील पाणी वितरण जाळे अमुलाग्र बदलणार आहे. शहरात जुन्या यंत्रणेनुसार ४६ ठिकाणी पाणी वितरणाचे व्हॉल्व आहेत. नवीन योजनेच्या अंमलबजावणीत शहरात केवळ १६ व्हॉल्व राहणार आहेत. या १६ ठिकाणांवरूनच संपूर्ण शहरात एकाचवेळी पाणी सोडले जाणार असून, अवघ्या चार तासांत शहरातील पाणी वितरण होणार असल्याचा दावा नगराध्यक्ष मयेकर हे करीत आहेत.
रत्नागिरीकरांसमोर या वाढीव नळपाणी योजनेच्या निमित्ताने अतिशय चांगले सप्तरंगी चित्र रंगवण्यात आले आहे. परंतु या प्रस्तावाला मंजुरी कधी मिळणार व आता पावसाळा तोंडावर असल्याने व पुढे निवडणूक आचारसंहिता असल्याने वाढीव नळपाणी योजनेचे काम मंजूर झाल्यास होणार कधी, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाले आहेत.
निवडणुकीआधी योजनेचे काम होणे दुरापास्त
रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीआधी वाढीव नळपाणी योजनेचे काम होणे सध्यातरी दुरापास्त आहे. विकासकामांचे श्रेय घेण्यावरून सध्या रस्सीखेच सुरू आहेच. त्याचप्रमाणे या योजनेचा मुद्दा निवडणुकीत मांडून मतांचे राजकारण होणार नाही कशावरून, अशीही चर्चा सुरू झाली आहे. एकूणच निवडणुकीच्या तोंडावर वाढीव नळपाणी योजनेचा उभा करण्यात आलेला हा बागुलबुवा स्वप्नरंजन ठरू नये, तर शहराला पाणी मिळावे, अशी नागरिकांची माफक अपेक्षा आहे. पाण्यासाठी करावी लागणारी प्रतीक्षा थांबविण्याची आशा आहे.