वाढीव घरपट्टीच्या नोटिसांचा खेळ रंगला
By Admin | Updated: March 19, 2015 23:55 IST2015-03-19T23:04:36+5:302015-03-19T23:55:15+5:30
इस्लामपूर पालिका : कर आकारणीबाबत हरकतीसाठी पैसे न भरण्याचा झळकला फलक

वाढीव घरपट्टीच्या नोटिसांचा खेळ रंगला
इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील वाढीव घरपट्टीच्या नोटिसांच्या खो—खोचा खेळ रंगतच चालला आहे. बंददिवशी मुख्याधिकाऱ्यांनी नि:शुल्क अपील करण्याला मान्यता दिली. त्यानंतर पुन्हा ५0 टक्के रक्कम भरण्याची टिमकी वाजवली, तर आज, तिसऱ्या दिवशी या खेळाची इतिश्री करीत, नवीन कर आकारणीची हरकत दाखल करतेवेळी ५0 टक्के रक्कम भरण्याची सक्ती नाही, असे फलक पालिकेने शहरात झळकवले.आज येथील विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांच्या दालनात माजी नगरसेवक विक्रमभाऊ पाटील यांनी पत्रकार बैठक घेऊन पालिका प्रशासनासह सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, मुख्याधिकारी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आहेत. त्यामुळेच अत्यंत चुकीच्या पध्दतीने नागरिकांची दिशाभूल केली जात आहे.
कलम ११९ प्रमाणे केवळ संकलित कराच्या नोटिसा देणे बंधनकारक असताना, त्यामध्ये सर्व करांचा समावेश करुन मालमत्ताधारकांवर आर्थिक भुर्दंड लादण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच या १९९ च्या नोटिसीवर केवळ अर्जाद्वारे कोणतीही रक्कम न भरता नियमानुसार हरकत घेता येते. मात्र प्रशासनाचा प्रयत्न पहिल्या अपिलाची सुनावणी होण्यापूर्वीच दुसऱ्या अपिलाचे आमंत्रण देत पैसे गोळा करण्याचा आहे, ही बाब बेकायदेशीर आहे.
पाटील म्हणाले, पहिल्या अपिलाची सुनावणी झाल्यानंतर त्याची यादी प्रसिध्द होईल. त्यानंतर पाचसदस्यीय समितीसमोरील दुसऱ्या अपिलाची नोटीस स्वतंत्रपणे प्रसिध्द करून नागरिकांना कळविले जाते. त्यावेळी सभागृहात निर्णय होईल त्याप्रमाणे ३0 अथवा ५0 टक्के रक्कम भरुन अपील स्वीकारण्याचे ठरवले जाईल.
त्यामुळे प्रशासनाने आताच ही घाई करून नागरिकांना लुबाडू नये. गेल्या २९ वर्षांपासून पालिकेचा कारभार करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या या सर्व गोष्टी माहीत आहेत. मात्र तरीही गेल्या ४—५ वर्षांपासून बेकायदेशीरपणे ५0 टक्के अपिलाची रक्कम भरुन घेतली जात आहे. हे जनतेची दिशाभूल करण्याचे काम तातडीने थांबवावे.
ही पत्रकार परिषद सुरु असतानाच नागरिकांना नवीन कर आकारणीवर कोणतीही रक्कम न भरता अपील करता येईल. ५0 टक्के रक्कम भरण्याची सक्ती नाही, असे आवाहन करणारे फलक शहरात लावले जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे या घरपट्टीच्या नोटिसांवरुन रंगलेला खेळ शेवटी पैसे न भरता अपील करण्याच्या मुद्यावर येऊन संपला. (वार्ताहर)
मुख्याधिकारी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली
विक्रमभाऊ पाटील म्हणाले की, पहिल्या अपिलाची सुनावणी झाल्यानंतर त्याची यादी प्रसिध्द होईल. त्यानंतर ५ सदस्यीय समितीसमोरील दुसऱ्या अपिलाची नोटीस स्वतंत्रपणे प्रसिध्द करून नागरिकांना कळविले जाते. त्यावेळी सभागृहात निर्णय होईल त्याप्रमाणे ३0 अथवा ५0 टक्के रक्कम भरुन अपील स्वीकारण्याचे ठरवले जाईल. पालिकेचे मुख्याधिकारी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आहेत. त्यामुळेच अत्यंत चुकीच्या पध्दतीने नागरिकांची दिशाभूल केली जात आहे.