गॅस्ट्रो रुग्णांच्या संख्येत वाढ
By Admin | Updated: November 27, 2014 00:19 IST2014-11-26T23:02:34+5:302014-11-27T00:19:32+5:30
नव्याने ३० रुग्ण दाखल : महापालिकेकडून रॅपीड सर्व्हे

गॅस्ट्रो रुग्णांच्या संख्येत वाढ
सांगली : गॅस्ट्रो साथीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्व्हेत आज, बुधवारी सांगली-मिरजेत नव्याने ३० रुग्ण आढळून आले. आतापर्यंत सांगलीच्या शासकीय रुग्णालयात गॅस्ट्रोचे ८० रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. आज दिवसभरात पालिकेने दोन हजार घरांचा सर्व्हे पूर्ण केला आहे.
गॅस्ट्रो साथीची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गॅस्ट्रो रुग्णांची सर्वाधिक संख्या मिरज शहरात आहे. आज, बुधवारी पालिकेच्या आरोग्य पथकाने केलेल्या सर्वेक्षणात मिरजेत नव्याने २० रुग्ण आढळून आले. त्यातील अकरा रुग्ण शासकीय रुग्णालयात, चार भारती हॉस्पिटल व इतर खासगी रुग्णालयात दाखल आहेत. ब्राह्मणपुरी, पिरजादे गल्ली, विसापूर वेस या परिसरात रुग्णांची संख्या अधिक आहे. मिरजेतील रेवणी गल्लीत जुलाबाचे रुग्ण आढळून आले. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सांगली शहरातील संजयनगर, अभयनगर, शंभरफुटी रस्ता, खणभाग, जमदाडे गल्ली, यशवंतनगर, माधवनगर रस्त्यावरील चिंतामणीनगर या परिसरात राहणाऱ्या काहीजणांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात २८ जणांवर उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून या रुग्णांना ताप, उलटी व जुलाबाचा त्रास सुरु होता. खासगी रुग्णालयात त्यांनी औषधोपचार घेतले, मात्र त्यांची प्रकृती खालावतच गेली. त्यामुळे ते शासकीय रुग्णालयात दाखल झाले. महापालिकेने घरोघरी सर्व्हेसाठी पथके नियुक्त केली आहेत. दररोज दोन हजार घरांचा सर्व्हे होत आहे. आतापर्यंत २० हजारहून अधिक घरांचा सर्व्हे पूर्ण करण्यात आला आहे. (प्रतिनिधी).
महापौर, उपमहापौरांना आली जाग
महापालिका क्षेत्रामध्ये गॅस्ट्रो व कॉलऱ्याने गंभीर स्वरूप धारण केले असून, या साथींवर उपाययोजना करण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरत आहे. गॅस्ट्रो रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा स्थितीत महापौर कांचन कांबळे व उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर यांनी गॅस्ट्रोच्या साथीकडे दुर्लक्ष केल्याची टीका होऊ लागली होती. महापौर, उपमहापौरांनी गेल्या सात दिवसात गॅस्ट्रो साथीबाबत ना बैठक घेतली, ना उपाययोजनांचा आढावा घेतला. सर्वच स्तरातून टीकेची झोड उठू लागल्यावर महापौर, उपमहापौरांना आज जाग आली. या दोघांनीही सांगलीच्या शासकीय रुग्णालयात येऊन रुग्णांची भेट घेतली व विचारपूस केली. काही रुग्णांच्या घरीही भेट दिली.
मदनभाऊंकडून खरडपट्टी
महापालिका क्षेत्रातील गॅस्ट्रो, कॉलरा साथीच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी काँग्रेसचे नेते मदन पाटील यांनी महापौर व उपमहापौरांना बोलावून त्यांची खरडपट्टी काढली. विरोधक रुग्णांना भेटी देत असताना तुम्ही काय करीत आहात, असा सवालही केला. आतापर्यंत गॅस्ट्रोबाबत आढावा घेऊन काय उपाययोजना केल्या, असा सवालही केला.