तासगावात बेकायदा बांधकामात वाढ
By Admin | Updated: June 8, 2015 00:51 IST2015-06-07T23:40:49+5:302015-06-08T00:51:00+5:30
नगरसेवकांचे हितसंबंध : नगरपालिकेच्या प्रशासनाकडून दुर्लक्ष; कारवाईची प्रतीक्षा

तासगावात बेकायदा बांधकामात वाढ
दत्ता पाटील - तासगाव -तासगाव शहराला बेकायदा बांधकामांचा विळखा पडल्याचे चित्र गेल्या काही महिन्यांपासून दिसून येत आहे. यापूर्वी उद्ध्वस्त करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणीच पुन्हा बेकायदा बांधकाम सुरु आहे. नगरसेवकांच्या हितसंबंधामुळे अशा बांधकामांत भर पडत आहेच, किंंबहुना नगरपालिकेच्या आरक्षित जागांवरही मोठ्या प्रमाणात होणारे अतिक्रमण काढण्याबाबतचे घोंगडेही अनेक वर्षांपासून भिजत पडले आहे. प्रशासनाची गांधारीची भूमिका आणि नगरसेवकांची साट्यालोट्याची भूमिका यामुळे कारवाई कोण करणार? असा प्रश्न तासगावकरांना पडला आहे.
तासगाव शहरात गेल्या काही वर्षांपासून बेकायदा बांधकाम आणि अतिक्रमणाचा विषय केवळ चर्चेतच राहिला आहे. हा विषय मार्गी लावण्यासाठी नगरपालिकेचे अधिकारी आणि कारभाऱ्यांनी कधीही पाठपुरावा केल्याचे दिसून आले नाही. तासगाव शहरात सराफ पेठेतून जाणाऱ्या रस्त्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला होता. या मास्टर प्लॅनची अंमलबजावणी करण्यासाठी सराफ पेठेतील अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. त्यानंतर सध्याचे खासदार संजय पाटील यांच्याहस्ते या ठिकाणी कामाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर हा विषय तसाच रेंगाळला. परंतु काही महिन्यांपासून अतिक्रमण पाडलेल्या ठिकाणीच पुन्हा नव्याने बेकायदेशीरपणे बांधकाम करण्यात येत आहे.
या ठिकाणी तीनमजली इमारतीचे बांधकाम सुरु आहे. नगरपालिकेच्या कार्यालयालगत असलेल्या या इमारतीकडे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. या बेकायदा बांधकामाविरोधात नगरसेवक अनिल कुत्ते यांनी सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित केला होता. नगरपालिकेचे पदाधिकारी आणि बांधकाम अभियंत्यांमुळेच बेकायदा बांधकामे होत असल्याचा आरोप कुत्ते यांनी केला होता. यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली होती. मात्र हा विषय ना नगरसेवकांनी गांभीर्याने घेतला, ना अधिकाऱ्यांनी.
विटा रोडला असणाऱ्या पाण्याच्या टाकीसमोर नगरपालिकेने शाळेसाठी आरक्षित ठेवलेल्या जागेवर बेकायदा बांधकाम होत असल्याची तक्रार वर्षापूर्वी सध्याचे नगराध्यक्ष संजय पवार आणि अनिल कुत्ते यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंंह कुशवाह यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावेळी हे अतिक्रमण पाडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र नगरपालिकेकडून याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही. किंबहुना या ठिकाणी अतिक्रमणात वाढच होत असल्याचे चित्र आहे. तासगाव शहरात इतरही अनेक ठिकाणी बेकायदेशीररित्या बांधकाम सुरु आहे. अनेक ठिकाणी अतिक्रमण केले जात आहे. हे सर्व होत असताना नगरपालिकेचे पदाधिकारी आणि अधिकारी सोयीस्कररित्या गांधारीची भूमिका घेऊन बसले आहेत. अनधिकृतपणे होणारे अतिक्रमण आणि बांधकाम हे बहुतांशी नगरसेवकांच्या हितसंबंधातूनच सुरु असल्याचे नगरसेवक अनिल कुत्ते यांच्या आरोपातून स्पष्ट झाले आहे. नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांचे हितसंबंधातील सोटेलोटे आणि निरंकुश प्रशासन यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे सुरु आहेत.
तासगाव शहराचे वेगाने विस्तारिकरण होत आहे. शहराच्या चौफेर सर्वत्र नव्याने वसाहती झालेल्या आहेत. शहरात सुरु असलेले बेकायदा बांधकाम आणि अतिक्रमण या विस्तारासाठी मोठा अडथळा ठरत आहे. शहरातील जुने मुख्य रस्ते सोडल्यास, नव्याने झालेला एकही रस्ता विस्तारित नाही. त्यामुळे वाहतूक आणि पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. अतिक्रमणे आणि बेकायदा बांधकामांना वेळीच ब्रेक लागला नाही, तर शहराला मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.
शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. नगरपालिकेजवळ एका नगरसेवकाच्या नातेवाईकानेच बेकायदा बांधकाम सुरु केले आहे. या बांधकामाला नगरपालिका प्रशासन जबाबदार आहे. बेकायदा बांधकामांविरोधात तक्रार करुनदेखील बांधकाम अभियंत्यांकडून सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असून आंदोलन करणार आहे.
- अनिल कुत्ते, नगरसेवक,
तासगाव नगरपरिषद.
आरक्षित जागांचे घोंगडे भिजत
तासगाव शहरात नगरपालिकेच्या मालकीच्या अनेक मोक्याच्या ठिकाणी आरक्षित जागा आहेत. बहुतांश ठिकाणी या जागांवर अतिक्रमण झाले आहे. या आरक्षित जागा खुल्या करण्यासाठी नगरपालिकेकडून पाचशेहून अधिक लोकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र हा विषय केवळ नोटिसीपुरताच मर्यादित राहिला. अद्यापही आरक्षित जागांचे घोंगडे भिजतच आहे.